कामगार परतल्याने ‘रेमण्ड’चे काम सुरू
By Admin | Updated: October 27, 2016 01:09 IST2016-10-27T01:09:51+5:302016-10-27T01:09:51+5:30
कामगार कामावर परतल्याने मागील पाच दिवसांपासून ठप्प पडलेले लोहारा एमआयडीसीतील ‘रेमण्ड युको डेनिम’चे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे.

कामगार परतल्याने ‘रेमण्ड’चे काम सुरू
तीन पाळीत काम : पाच दिवस ठप्प पडले होते उत्पादन
यवतमाळ : कामगार कामावर परतल्याने मागील पाच दिवसांपासून ठप्प पडलेले लोहारा एमआयडीसीतील ‘रेमण्ड युको डेनिम’चे उत्पादन पूर्ववत सुरू झाले आहे. नेहमीप्रमाणे तीन पाळीत उत्पादनाची प्रक्रिया केली जात आहे.
गेले पाच दिवस काही कामगारांनी नवीन वेतन कराराला विरोध दर्शवित काम बंद केले होते. कंपनीने अधिकृत कामगार संघटनेशी पुढील चार वर्षांसाठी केलेला नवीन वेतन करार या कामगारांना मान्य नव्हता. रेमण्ड कामगार संघाने वेतन कराराला विरोध दर्शवीत काम बंद आंदोलन सुरू केले होते. केवळ २0 टक्केच कामगार कामावर होते. त्यामुळे कंपनीचे उत्पादन ठप्प पडले होते. कंपनी प्रशासनाने काम बंद करणाऱ्या कामगारांशी बोलणी करण्यास नकार दर्शविला होता. यामुळे तिढा वाढला होता.
नवीन वेतन करारावरूनच रेमण्ड कामगार संघाने कंपनीला काम बंद करण्याची कोटीस दिली होती. त्याविरूद्ध कंपनीने औद्योगिक न्यायालयात प्रकरण दाखल केले. त्यावर औद्योगिक न्यायालयाने मंगळवारी निर्णय देताना कामगारांना तत्काळ कामावर परतण्याचे आदेश दिले. त्याला अनुसरून बुधवारी कामगार कामावर परतले. आता तीन पाळीत कंपनीचे काम पुन्हा सुरू झाले आहे.
कामगारांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याचे रेमण्ड कामगार संघाचे अध्यक्ष योगेश जाधव यांनी सांगितले. भारतीय विश्वकर्मा मील मजदूर संघटनेचे अध्यक्ष वेदराज ऊर्फ विकास जोमदे यांनीही आजपासून कंपनीचे काम पूर्ववत सुरू झाल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
पहिली, दुसरी व सामान्य पाळी सुरळीत
काम बंद आंदोलनानंतर आज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंतच्या पहिल्या पाळीत ४९२, सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंतच्या सामान्य पाळीत २३९, तर दुपारी ३ वाजतापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या पाळीत ५0३ कामगार कामावर होते. या सर्व पाळ्यात सर्वच कामगार उपस्थित होते. कंपनीचे कामकाज आता पूर्ववत सुरळीत सुरू झाल्याचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख चंद्रशेखर पातुरकर यांनी सांगितले.