शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:44 IST2018-11-30T23:44:16+5:302018-11-30T23:44:56+5:30
यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे शुक्रवारी केली.

शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : यवतमाळात मंजूर झालेले परंतु नंतर मुख्यमंत्र्यांच्या गावी मूल जि. चंद्रपूर येथे पळविलेले शासकीय कृषी महाविद्यालय यवतमाळला परत देण्यात यावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे शुक्रवारी केली. याच मुद्यावर दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनीसुद्धा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, हे विशेष.
शासनाने २०१६ मध्ये यवतमाळात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र अचानक हे मंजूर कृषी महाविद्यालय रद्द करण्याची घोषणा शासनाने केल्याने शेतकरीपुत्रांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यावर आधारित शिक्षण घेण्याकडे कल वाढतो आहे. हे महाविद्यालय कायम ठेवल्यास शासकीय कोट्यातून शिक्षण पूर्ण करणे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांना शक्य होईल. अचानक महाविद्यालय रद्द करण्याचा निर्णय हा शेतकरी विरोधी व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला खीळ घालणारा ठरला आहे. त्यामुळे यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय परत द्यावे, अशी जोरदार मागणी आमदार ख्वाजा बेग यांनी विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात केली. कृषी महाविद्यालय परत न मिळाल्यास शेतकरी व कृषी प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना घेऊन मोठा लढा उभारावा लागेल, असा इशाराही आमदार बेग यांनी दिला.
यवतमाळच्या शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम आवाज उठविला होता, हे विशेष. हे महाविद्यालय रद्द करून आता अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयावर जिल्ह्याची बोळवण केली जात आहे. तेही दोन वर्षांनी प्रत्यक्ष सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.