सेवानिवृत्त कर्मचारी लाभापासून वंचित
By Admin | Updated: September 10, 2015 03:03 IST2015-09-10T03:03:08+5:302015-09-10T03:03:08+5:30
वणी नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी विविध लाभांपासून वंचित आहेत.

सेवानिवृत्त कर्मचारी लाभापासून वंचित
यवतमाळ : वणी नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी विविध लाभांपासून वंचित आहेत. सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अजूनही त्यांना मिळालेली नाही. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून मुख्याधिकाऱ्यांना आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.
वणी येथील सेवानगरातील समाज मंदिरात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ.के. विंचूरकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेत सेवानिवृत्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिवाय काही सेवानिवृत्तांच्या वैयक्तिक प्रश्नांवरही विचार विनिमय करण्यात आला. गोविंद नारायण चवरे हे २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांना पेन्शन विक्री तसेच आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ अजूनही मिळाला नाही. त्यांची प्रकृती बिघडली आहे. परंतु हक्काची रक्कम पालिकेकडून दिली जात नाही. आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ, पेन्शन विक्रीची रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. सभेमध्ये अशोक नायगावकर, दिगंबर देशमुख यांनी सेवानिवृत्तांच्या समस्या मांडल्या. प्रसंगी संघटनेच्या वणी शाखेचे प्रमुख म्हणून श्रीराम विद्याधर किटकुले यांची निवड करण्यात आली. सेवानिवृत्तांनी संघटित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अ.के. विंचूरकर यांनी केले. (वार्ताहर)