३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे अखेर पुनर्गठण
By Admin | Updated: August 27, 2015 00:15 IST2015-08-27T00:15:04+5:302015-08-27T00:15:04+5:30
३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे अखेर पुनर्गठण
जिल्हा बँकेचा निर्णय : हेक्टरी १० हजार देणार
यवतमाळ : ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
शासनाने जिल्हा बँकेला त्यांचा निधी उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण रखडले होते. या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची खास बैठक बोलाविली गेली होती. त्यात पुनर्गठणावर सविस्तर चर्चा झाली. बँकेला शासनासह संंबंधित एजंसीजकडून ११३ कोटी रुपयांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ७० ते ८० कोटी एवढीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुमारे १८ कोटी हवे असताना केवळ १६ कोटी रुपये मंजूर केले गेले.
मात्र त्यानंतरही ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जाच्या रकमेत मात्र कपात करण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये या दराने कर्ज दिले जाणार आहे. पेरणीचा संपलेला वेळ आणि लवकरच हाती येणारे सोयाबीनचे पीक ही कारणे यासाठी दिली गेली आहे. (प्रतिनिधी)