पुसद हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By Admin | Updated: December 23, 2016 02:26 IST2016-12-23T02:26:50+5:302016-12-23T02:26:50+5:30

आजही पुसद तालुक्यातच नव्हेतर शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचास बसणारे आहेत.

Resolve to abstain from prostitution | पुसद हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

पुसद हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

दोन गुड मॉर्निंग पथक : शहरात १३०० घरांमध्ये शौचालय नाही
पुसद : आजही पुसद तालुक्यातच नव्हेतर शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचास बसणारे आहेत. या बाबीचे दुष्परिणाम लक्षात घेता आता पुसद शहर संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार नगरपरिषदेने कलो आहे. त्या अनुषंगाने उघड्यावर प्रात:विधीस जाणाऱ्या लोकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये १३०० घरांमध्ये शौचालयच नसल्याचे उघडकीस आले. या सर्वांना नगरपरिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
नगरपरिषदेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय वाटप कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी शौचालयाचा फॉर्म व त्याबाबतची माहिती नागरिकांना मिळणार आहे. नगरपरिषदेकडून वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान घेवून बांधकाम न करणाऱ्या उघड्यावर प्रात:विधीस जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी घाण पसरविणाऱ्यांविरुद्ध आता पुसद नगरपरिषदेने मोहीम हाती घेतली आहे. १९ डिसेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. यासाठी दोन गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने गेल्या चार दिवसात अनेकांना गांधीगिरीच्या माध्यमातून घरी शौचालय बांधण्याबाबत विनंती केली आहे. तसेच शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पालिकेच्यावतीने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. हे गुड मॉर्निंग पथक दररोज सकाळ व संध्याकाळी विविध भागात फिरून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना समज देण्यात येत आहे.
पुसद शहरात एकूण २८०० घरी शौचालय नाही. त्यापैकी १६०० कुटुंबियांना शौचालय बांधकामासाठी मंजुरात देण्यात आली आणि ९०० जणांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता जवळपास १३०० घरांसाठी नव्याने अनुदान देण्यात येणार आहे. शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
प्रथम समज दिल्यानंतरही कोणी उघड्यावर शौचास बसताना दिसल्यास कायदेशीर कारवाईला त्याला सामोरे जावे लागेल. यासाठी गुड मॉर्निंग पथक कार्यरत आहे. नगरपरिषदेकडून शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेवूनही ज्यांनी बांधकामच केले नाही अशांचाही तपास सुरू असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)

कलापथकाद्वारे केली जात आहे जनजागृती
शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कलापथकाद्वारा जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये सात कलावंतांचा समावेश आहे. यासोबतच घरोघरी जावून स्वच्छता अभियानाबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांनी पूस नदी परिसरात शौचास जावू नये, यासाठी तेथील झुडुंपांचीही साफसफाई करण्यात येणार आहे. शहरात एकूण २४ सार्वजनिक शौचालय आहेत. त्यांचा वापर सर्व नागरिकांनी करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी केले आहे.

 

Web Title: Resolve to abstain from prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.