नगरसेवकांना अंधारात ठेऊन घेतले लाखोंच्या कामाचे ठराव
By Admin | Updated: January 8, 2017 01:07 IST2017-01-08T01:07:02+5:302017-01-08T01:07:02+5:30
स्थानिक नगरपंचायतीमधील सत्तारुढ शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी विरोधी पक्षातील नगरसेवकांना अंधारात ठेऊन लाखो रुपयाचे ठराव घेत आहे.

नगरसेवकांना अंधारात ठेऊन घेतले लाखोंच्या कामाचे ठराव
कळंब नगरपंचायत : सात नगरसेवकांची तक्रार, कारवाईकडे लक्ष
कळंब : स्थानिक नगरपंचायतीमधील सत्तारुढ शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी विरोधी पक्षातील नगरसेवकांना अंधारात ठेऊन लाखो रुपयाचे ठराव घेत आहे. सर्वसाधारण सभेत चर्चा न करताही ठराव लिहिले जातात. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक राजू पड्डा यांच्यासह सात नगरसेवकांनी केली आहे. याविषयावरुन सत्तारुढ पक्ष आणि विरोधी पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहे.
नगरपंचायतीला रस्ता अनुदान योजनेसाठी २० लाख रुपये प्राप्त झाले. त्यानंतर १९ मे २०१६ रोजी नगरपंचायतची सर्वसाधारण सभा पार पडली. परंतु या सभेत सदर निधीतील रस्ते कुठे तयार करावे, याची कुठलीही चर्चा करण्यात आली नाही. असे असले तरी, याच सभेत रस्ते कुठे तयार करावे, याचा ठराव परस्पर मंजुर करण्यात आला. हा सर्व नियमबाह्य प्रकार सत्तारुढ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून केला आहे, असा आरोप नगरसेवक राजू पड्डा यांनी केला. विशेष म्हणजे केवळ तीन प्रभागातच २० लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये शिवसेना व भाजपाच्याच नगरसेवकांच्या प्रभागात ही कामे घेण्यात आली. इतर प्रभागांना मात्र डावलण्यात आले.
सदर योजनेतील निधी वापरताना सर्व नगसेवकांना विश्वासात घेऊन काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर ठराव रद्द करुन सर्वांना विश्वासात घेऊन पुन्हा ठराव घेतला जावा. तसेच सभेत चर्चा झालेल्या विषयाचेच ठराव घेण्यात यावे, अशी मागणी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर राजू पड्डा, फारुक सिध्दीकी, सुनंदा आसुटकर, वैशाली नवाडे, रिता वाघमारे, वैशाली मारोती वानखडे, शैलजा उमरतकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे तक्रारकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)