यवतमाळ पालिकेत ‘तारांगण’चा ठराव
By Admin | Updated: March 25, 2017 00:13 IST2017-03-25T00:13:22+5:302017-03-25T00:13:22+5:30
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा आणि खगोल शास्त्राची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठी यवतमाळात तारांगण उभारण्यासाठी

यवतमाळ पालिकेत ‘तारांगण’चा ठराव
अडीच कोटींची तरतूद : विजय दर्डा यांचा पुढाकार, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद
यवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा आणि खगोल शास्त्राची शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठी यवतमाळात तारांगण उभारण्यासाठी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी पुढाकार घेतला आहे. आता नगरपरिषदेने शुक्रवारी सायंकाळी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत तारांगणासाठी ठराव मंजूर केला. तर जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी नावीन्यपूर्ण निधीतून अडीच कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे यवतमाळात तारांगण उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
अंतराळ क्षेत्र नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. अंतराळात घडणाऱ्या घटनांची जिज्ञासा विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही असते. परंतु आवश्यक ती उपकरणे उपलब्ध नसल्याने माहिती मिळत नाही. यासाठीच यवतमाळ शहरात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे तारांगण उभारण्याचा विषय पुढे आला. विजय दर्डा यांनी नागपूर मार्गावर प्रस्तावित क्रिकेट स्टेडियम व तारांगणच्या निर्मितीसाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी १७ फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तारांगण हे शहरातील मध्यभागात साकारण्याची तयारी दर्शविली. यासाठी नावीन्यपूर्ण निधीतून आर्थिक तरतूद करण्याचेही मान्य केले. आता नगरपरिषदेने विशेष सभेत ठराव करून शहराच्या नावलौकिकात भर पाडण्याचा निर्धार केला आहे. या तारांगणात डिजीटल मल्टी प्रोजेक्ट फुल डेमो सिस्टीम बसविण्यात येणार आहे. तसेच अंतराळ निरीक्षणासाठी मोठा टेलिस्कोपही येथे लावण्यात येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कक्षा रुंदावतील असे नगरपरिषदेने मंजूर केलेल्या ठरावत म्हटले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
विशेष सभेत बांधकाम परवानगी घेताना आकारल्या जाणाऱ्या विकास शुल्कावर दीर्घ चर्चा झाली. हद्दवाढीने शहरात अनेक अविकसित ले-आऊट समाविष्ठ झाले. येथे विकास शुल्काची आकारणी करताना सरसकट न करता त्या भागातील सर्वे करून व उपलब्ध सोर्इंचे शुल्क वगळून करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार हा ठराव मंजूर करण्यात आला.