सहा नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर
By Admin | Updated: August 21, 2015 02:53 IST2015-08-21T02:53:11+5:302015-08-21T02:53:11+5:30
नव्यानेच नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या महागाव, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब, झरीजामणी या सहा ठिकाणचे प्रभागनिहाय आरक्षण गुरुवारी काढण्यात आले.

सहा नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर
कही खुशी कही गम : आता नजरा नगराध्यक्षपदाकडे, ५० टक्के आरक्षणातून ७२ महिलांना संधी
यवतमाळ : नव्यानेच नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या महागाव, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब, झरीजामणी या सहा ठिकाणचे प्रभागनिहाय आरक्षण गुरुवारी काढण्यात आले. ग्रामपंचायती असताना गावाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांचा या आरक्षण सोडतीनंतर भ्रमनिरास झाला. तर अनेक नव्या इच्छूकांसाठी मात्र राजकारणाचा मार्ग खुला झाला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायत झाल्याने सदस्यसंख्या वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मात्र अपेक्षा उंचावल्या आहेत. आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राळेगावात महिलांची सरशी
राळेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली १७ प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निघालेले आरक्षण काहींकरिता खुशीचे तर अनेकांसाठी निराशेचे ठरले आहे. १७ पैकी ९ ठिकाणी महिलांसाठी आरक्षण निघाले आहे.त्यातही अनुसूचित जातीकरिता दोन तर अनुसूचित जमातीकरिता तीन जागा राखीव असल्याने ना.मा.प्र. आणि खुल्या जागेवर पुरुषांकरिता फक्त मोजक्या सहा जागांची संधी उरली आहे.
सर्वप्रथम अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता प्रभाग आरक्षित करण्यात आले. त्यानंतर लहान मुलीच्या हस्ते विविध प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता चिठ्या काढून प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे, मुख्याधिकारी व नायब तहसीलदार मधुकर गेडाम, मंडळ अधिकारी बी. एन. पोटे आदी हजर होते. शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व निवडणुकीस इच्छूकांनी यावेळी सभागृहात गर्दी केली होती. राळेगावचे आरक्षण पुढीलप्रमाणे निघाले आहे.
प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती, दोन अनुसूचित जमाती महिला, तीन अनुसूचित जमाती महिला, चार सामान्य, पाच अनुसूचित जाती महिला, सहा नामाप्र महिला, सात नामाप्र महिला, आठ सामान्य, नऊ नामाप्र, दहा सामान्य महिला, अकरा सामान्य, बारा अनुसूचित जाती, तेरा सामान्य, चौदा सामान्य महिला, पंधरा नामाप्र महिला, सेळा सामान्य महिला, सतरा नामाप्र असे आरक्षण जाहीर झाले आहे. आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
महागावात मातब्बरांची निराशा
महागाव नगरपंचायतीच्या १७ वॉर्डाचे आरक्षण येथील तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता काढण्यात आले. उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, तहसीलदार के. डी. वायकोस यांची प्रमुख उपस्थिती होती. महागावातील वॉर्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. वॉर्ड क्रमांक एक खुला, दोन खुला, तीन खुला, चार अनुसूचित जाती महिला, पाच खुला महिला, सहा खुला महिला, सात अनुसूचित जाती महिला, आठ नामाप्र महिला, नऊ खुला महिला, दहा नामाप्र महिला, अकरा अनुसूचित जाती, बारा नामाप्र महिला, तेरा खुला, चौदा अनुसूचित जमाती, पंधरा नामाप्र, सोळा नामाप्र, सतरा सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणापूर्वी नगरसेवक बनण्याची इच्छा असलेल्या अनेक मातब्बरांचा आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे. वॉर्ड आरक्षणामुळे आता उमेदवार निवडप्रक्रियेला वेग आला आहे.
कळंबमध्ये ९ जागा महिलांना
कळंब नगरपंचायत सभागृहात ईश्वरचिठ्ठीने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १७ नगरसेवकांपैकी ९ जागा महिलांसाठी विविध प्रवर्गात आरक्षित करण्यात आल्या आहेत. वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. वार्ड क्रमांक एकमध्ये ओबीसी महिला, दोन सर्वसाधारण, तीन सर्वसाधारण महिला, चार सर्वसाधारण, पाच ओबीसी सर्वसाधारण, सहा अनुसूचित जाती, सात ओबीसी महिला, आठ अनुसूचित जमाती, नऊ सर्वसाधारण, दहा सर्वसाधारण महिला, अकरा अनुसूचित जाती महिला, बारा सर्वसाधारण , तेरा अनुसूचित जमाती महिला, चौदा ओबीसी महिला, पंधरा सर्वसाधारण महिला, सोळा सर्वसाधारण महिला, सतरा ओबीसी सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार एस. एम. होटे, एम. एस. व्यवहारे, मंडळ अधिकारी आर. जी. शिंदे, तलाठी विजय मेश्राम यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. (लोकमत चमू)