आरक्षणाने ‘कही खुशी, कही गम’
By Admin | Updated: October 6, 2016 00:19 IST2016-10-06T00:19:58+5:302016-10-06T00:19:58+5:30
जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचन भवनात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

आरक्षणाने ‘कही खुशी, कही गम’
जिल्हा परिषद : अनेक दिग्गजांना शोधावा लागेल नवीन पर्याय
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचन भवनात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणामुळे ‘कही खशी, कही गम’, अशी अवस्था झाली. पुसद तालुक्यात सर्वाधिक आठ जागा असून त्यापैकी केवळ एकच जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने दिग्गजांना फटका बसला आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रथम अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांचे, नंतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणात पुसद तालुक्याला मोठा फटका बसला. आठपैकी केवळ एकच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. उर्वरित सहापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सामान्य महिलेसाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित झाली. तीन जागा अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसाठी आहे. माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांना आता केवळ मोहा-भंडारी याच एका गटातून लढता येणार आहे.
यवतमाळ तालुक्यातही मोठी उलथापालथ झाली. या तालुक्यात तीन जागा कमी झाल्या. आता चार जागांपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांना आता आसोला-तळेगाव आणि चिचघाट-येळाबारा या मतदार संघातून लढावे लागणार आहे. यात चिचघाट-येळाबारा गटात माजी सदस्य चंद्रकांत गाडे यांचे वर्चस्व आहे. मांगुळकर आणि गाडे यवतमाळ बाजार समितीच्या निवडणुकीत परस्पर विरोधात पॅनल लढवीत आहे.
दारव्हा तालुक्यात पाचपैकी चार जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. त्यामुळे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे आणि बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांच्यासाठी बोरी-तळेगाव मतदार संघ शिल्लक आहे. कळंब तालुक्यातील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासाठी जोडमोहा-डोंगरखर्डाचा पर्याय आहे. राळेगाव तालुक्यातही तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने माजी अध्यक्ष अॅड.प्रफुल मानकर आणि माजी सदस्य चित्तरंजन कोल्हे यांना वरध-झाडगाव मतदार संघच उरला आहे. शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या मारेगाव तालुक्यातील दोनपैकी एक जागा खुली, तर दुसरी जागा ओबीसीसाठी असल्याने त्यांचा मार्ग पुन्हा सुकर झाला आहे. वणी तालुक्यात चारपैकी केवळ घोन्सा-कायर मतदार संघ खुला आहे. (शहर प्रतिनिधी)