कर्ज परत करा, अन्यथा गुंड पाठवू
By Admin | Updated: March 26, 2017 01:20 IST2017-03-26T01:20:43+5:302017-03-26T01:20:43+5:30
प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर कर्जवसुलीची कार्यवाही थांबविणाऱ्या मायक्रो फायनान्सचे सुटाबुटातील गुंड पुन्हा एकदा कर्जवसुलीसाठी ग्रामीण भागात सक्रीय झाले आहेत.

कर्ज परत करा, अन्यथा गुंड पाठवू
मायक्रो फायनान्स एजंटांच्या धमक्या : कर्जदार महिला पुन्हा दहशतीखाली
वणी : प्रशासनाच्या मध्यस्तीनंतर कर्जवसुलीची कार्यवाही थांबविणाऱ्या मायक्रो फायनान्सचे सुटाबुटातील गुंड पुन्हा एकदा कर्जवसुलीसाठी ग्रामीण भागात सक्रीय झाले आहेत. कर्जाची परतफेड करा, अन्यथा गुंडाकरवी घरात शिरून मारहाण केली जाईल, अशा धमक्या ग्रामीण भागातील कर्जदार महिलांना एजंटाकडून मिळत आहेत. त्यामुळे कर्जदार महिला पुन्हा एकदा दहशतीखाली आल्या आहेत.
आंध्रप्रदेशातील विविध फायनान्स कंपन्यांनी वणी उपविभागात आपले जाळे पसरले आहे. खेडेगावातील गरजू महिलांना एकत्र करून त्यांना जुजबी कागदपत्रावर कर्ज वाटप करायचे व नंतर वारेमाप व्याजदर आकारून कर्जाची वसुली करायची. कर्जाची परतफेड न केल्यास धमक्या देऊन कर्जाची वसुली करायची, असा नवा धंदाच या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आरंभला होता. या विरोधात ‘लोकमत’ ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्याच सूचनेवरून कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी वणी येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीला वणी उपविभागातील हजारो कर्जदार महिला उपस्थित होत्या. मायक्रो फायनान्सचे कर्ज परत करू नये, कुणी गावात कर्जाचे हप्ते वसुली करण्यासाठी आले, तर त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार द्या, आम्ही गुन्हे दाखल करून असे महिलांना सांगण्यात आले. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून मायक्रो फायनान्सच्या एजंटांनीही नांग्या टाकल्या होत्या. गेल्या दोन महिन्यात कर्जवसुली थांबली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मायक्रो फायनान्सचे एजन्ट पुन्हा एकदा गावखेड्यात सक्रीय झाले आहेत. गटाच्या अध्यक्ष महिलेला पकडून तिच्यावर अन्य महिलांकडून कर्ज वसुली करण्यासंदर्भात दबाव आणला जात आहे. तुमच्या मुलाचे शिक्षण थांबवू, घराचा लिलाव करू, कर्ज भरले नाही तर तुमचे आधार कार्ड रद्द होईल, तुमच्या खात्यातील रक्कम आम्ही परस्पर काढून घेऊ, यापुढे तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देणार नाही. कर्ज भरले नाही तर तुम्हाला गुंडाकरवी मारहाण करू, अशा धमक्या या एजन्टांकडून दिल्या जात आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)
सोमवारी वणीत कर्जदार महिलांची सभा
मायक्रो फायनान्स कंपन्याशी संघर्ष करण्याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे यांनी महिला कर्जमुक्ती संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीच्यावतीने कर्जमुक्तीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता वणी येथील शेतकरी मंदिरात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला वणी उपविभागातील वणीसह मारेगाव व झरी तालुक्यातील कर्जदार महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक दिलीप काकडे यांनी केले आहे.