माहूर गडावर रेणुकेचा नवरात्रौत्सव
By Admin | Updated: October 14, 2015 02:52 IST2015-10-14T02:52:37+5:302015-10-14T02:52:37+5:30
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानवर अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात ..

माहूर गडावर रेणुकेचा नवरात्रौत्सव
भक्तांची मांदियाळी : नऊ दिवस विविध कार्यक्रम, प्रशासन सज्ज
पुंडलिक पारटकर माहूर
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानवर अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात आणि उदे गं अंबे उदेच्या गजरात मंगळवारी पहाटे पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांच्या हस्ते विधिवत पूजेअर्चेनंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित असून या काळात लाखो भाविक रेणुकेच्या दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
देवी महात्म्यात नवरात्रीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पराक्रमाचा, शौर्याचा पवित्र काळ. सतत नऊ दिवस रणचंडिकेने दृष्ट राक्षसांसोबत घनघोर युद्ध करून आपला पराक्रम दाखविला तो कालखंड. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीने पराक्रम करुन विजयादशमीस विजय संपादित केला. त्याच काळाला शारदीय नवरात्र असे म्हणतात. माहूर येथे नऊ दिवस नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित आहे. अश्विनशुद्ध प्रतिपदा १३ आॅक्टोबर रोजी विधीवत पूजेने उत्सवाला प्रारंभ झाला. रेणुकेच्या पूजेअर्चेनंतर मंदिर परिसरातील श्री तुळजाभवानी मंदिर, परशुराम मंदिर, महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीचा कलश व त्यात नागवेलीची पाने, श्रीफळ आणि सभोवताल उसाचे धांडे उभारून घटस्थापना करण्यात आली.
प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदिरात अखंड नंदादीप तेवत राहणार आहे. दररोज पायस म्हणजे दहीभात, पुरणपोळीचा नैवेद्य, आरतीनंतर छबिना काढला जाईल. रेणुका ज्या गडावर प्रगटली त्या गडाला प्रदक्षिणा घालून छबिना रेणुका मंदिरात परत येतो. भाविकांसाठी महाप्रसादासोबत सप्तशती शतचंडी ग्रंथाचे पठण, महाआरती, महापूजा कार्यक्रम घेतले जाणार आहे.