भाड्याचा भुर्दंड अन् लांब फेराही
By Admin | Updated: February 7, 2015 01:40 IST2015-02-07T01:40:02+5:302015-02-07T01:40:02+5:30
कोट्यवधी रुपयांचे पूल आणि रस्ते होऊनही राळेगाव, यवतमाळ, चंद्रपूर आणि हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक या मार्गावरून बस सोडण्यास उत्सुक नाहीत.

भाड्याचा भुर्दंड अन् लांब फेराही
राळेगाव : कोट्यवधी रुपयांचे पूल आणि रस्ते होऊनही राळेगाव, यवतमाळ, चंद्रपूर आणि हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक या मार्गावरून बस सोडण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह २५ ते ५० किमीचा फेरा करावा लागतो.
दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून एसटी बससे राळेगावपर्यंत आणि राळेगाव वरून पुढील स्थानकापर्यंत सुरू केल्या जात नाही. त्यामुळे शासनाने विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ते व पूल बांधण्यापूर्वी ते या मार्गावर भविष्यात एसटी सुरू करणार की नाही याची लेखी परवानगी घ्यावी काय, महामंडळाने परवानगी दिल्यानंतरच रस्ते, पूल बांधावे काय असा प्रश्न संतप्त नागरिकांडून उपस्थित होत आहे.
तालुक्यातील पार्डी आणि हिंगणघाट तालुक्यातील पोहणा या दोन गावांच्या मधातून वाहणाऱ्या वर्धा नदीवर दोन वर्षांपूर्वी सहा कोटी रुपयांचा पूल, दोन कोटी रुपयांचा रस्ता, लहान पूल, जोडरस्ता झाला. कळंब तालुक्यातील चिंचोली, देवळी तालुक्यातील अंदोरी या दोन गावाच्या मधातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरही पाच-सहा कोटींचा भव्य पूल झाला. कोट्यवधीचे नवे रस्ते झाले. खैरी, कोसारा, मांडळी, वरोरा या मार्गावरही पूल आणि रस्ते झाले.
खासगी वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक या पुलावरून सुरू झाली. मात्र सर्वसामान्यांची लोकवाहिनी एसटी बस या मार्गावरून सुरू झालेली नाही. गेली दोन वर्षात वारंवार प्रवासी, प्रवासी संघटना, ग्राहक पंचायत आदींनी मागणी करूनही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. चिंचोली, अंदोरी पुलावरून वर्धा आगाराची मिनीबस मोजक्या फेऱ्या करते. वरोरा आगाराची मिनीबस खैरी गावापर्यंत काही फेऱ्या चालविते. मात्र राळेगाव, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगणघाट आगाराने या मार्गावरून बसफेऱ्या सुरू केल्या नाही. (तालुका प्रतिनिधी)