सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी वेधले लक्ष
By Admin | Updated: January 31, 2016 02:42 IST2016-01-31T02:42:52+5:302016-01-31T02:42:52+5:30
सर्व धर्मातील प्रार्थनास्थळे एकाच ठिकाणी पाहण्याचा दुर्मिळ क्षण उमरखेडवासीयांना उपभोगता आला.

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांनी वेधले लक्ष
उमरखेडमध्ये आयोजन : इनरव्हील क्लबतर्फे प्रतिकृतींचे प्रदर्शन
उमरखेड : सर्व धर्मातील प्रार्थनास्थळे एकाच ठिकाणी पाहण्याचा दुर्मिळ क्षण उमरखेडवासीयांना उपभोगता आला. इनरव्हील क्लबच्यावतीने औदुंबर नगरीमधील सर्व प्रार्थनास्थळांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
स्थानिक महात्मा जोतिबा फुले विद्यालयात प्रार्थनास्थळांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार भगवान कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे डॉ. या.मा. राऊत, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गजानन येलुरे, सचिव कैलास उदावंत, पतंजलीचे अध्यक्ष यशवंत गिरी, तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अॅड. विलास देवसरकर, तलाठी दत्तात्रय दुर्केवार, पतंजलीच्या महिला अध्यक्ष प्रतिभा जासूद, इनरव्हील क्लबच्या चार्टर्ड प्रेसिडेंट डॉ. विमल राऊत तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या अनोख्या प्रदर्शनाचा महिलांनीही अधिकाधिक लाभ घ्यावा, म्हणून प्रदर्शनस्थळी हळदी-कुकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण का रखे ध्यान, तभी बनेगा देश महान’ अशा संदेश असलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून प्लास्टिक कॅरीबॅग हद्दपार करण्याचा निर्धार इनरव्हील क्लबने व्यक्त केला. यावेळी एक हजार एक कापडी पिशव्यांचे वाटप झाले. क्लबच्या उपाध्यक्ष जया देशमुख यांनी स्वागतगीत सादर केले.
कल्पना पांडे, मनीषा काळेश्वरकर, उषा पाटील, मीनाक्षी गायकवाड, वीणा बोनुलकर, सुनंदा कदम आदी उपस्थित होत्या. संचालन राधिका भट्टड यांनी केले, तर आभार जयमाला लांडे यांनी मानले. (प्रतिनिधी)