मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी
By Admin | Updated: November 12, 2016 01:45 IST2016-11-12T01:45:23+5:302016-11-12T01:45:23+5:30
घरात असलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी प्रसंगी मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी लावली जात आहे.

मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी
नोटा बंदची धास्ती : सोनखास, उत्तरवाढोणा बँकेत गर्दी
सोनखास : घरात असलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी प्रसंगी मजुरीवर पाणी सोडून बँकेत हजेरी लावली जात आहे. नोटा बंदची धास्ती घेतलेल्या या नागरिकांची सोनखास आणि उत्तरवाढोणा येथील बँकेत प्रचंड गर्दी झाली आहे. सकाळपासूनच बँकेसमोर रांगा लागत आहे. युवक, वृद्ध मंडळींचीही गर्दी याठिकाणी झाल्याचे चित्र आहे.
बुधवारी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमांद्वारे गावखेड्यापर्यंत पोहोचले. त्याच रात्रीपासून जवळ असलेल्या नोटांचे काय, हा भीतीयुक्त प्रश्न निर्माण झाला. जवळचे पैसे सुरक्षितच राहील हे स्पष्ट केल्यानंतरही अनेक नागरिकांनी जवळची जमापुंजी बँकेत जमा करण्यासाठी धडपड चालविली. यात लहान व्यावसायिकांपासून ते मजूर वर्ग, शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी केली. घरात असलेली ५०० रुपयांची एक नोटही बँकेत भरण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडियाची उत्तरवाढोणा शाखा आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालखेड(खुर्द) येथील शाखेतील गर्दी बँकेचे दार बंद होईपर्यंत कायमच होती. शिवाय वापरासाठी पैसा नसल्याने रक्कम काढणाऱ्यांचीही त्यात भर पडली. एक हजार ते दोन हजार रुपयांच्या रकमेचा विड्रॉल दिला जात होता. शुक्रवारी सदर दोनही गावातील एटीएम सुरू झाले नव्हते. त्यामुळेही रक्कम काढणाऱ्यांचा लोंढा बँकेत होता. (वार्ताहर)