मृतदेह घेऊन नातेवाईक वणी ठाण्यावर
By Admin | Updated: February 6, 2017 00:17 IST2017-02-06T00:17:13+5:302017-02-06T00:17:13+5:30
खासगी लाईनमनच्या मृत्यूला वीज वितरण जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट वणी पोलीस ठाण्यात आणला.

मृतदेह घेऊन नातेवाईक वणी ठाण्यावर
विजेच्या धक्क्याने तरुण ठार : महावितरणच्या संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी
वणी : खासगी लाईनमनच्या मृत्यूला वीज वितरण जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट वणी पोलीस ठाण्यात आणला. संबंधितांवर गुन्हे दाखल करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त नातेवाईक करीत होते.
रामा रामकृष्ण जगनाडे (३५) रा. राजूर कॉलरी असे मृत तरुणाचे नाव आहे. २८ जानेवारी रोजी वीज खांबावर काम करीत असताना तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामाच्या मृत्यूला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राजूर कॉलरी येथील तब्बल २०० नागरिकांनी मृतदेह घेऊन थेट वणी पोलीस ठाणे गाठले.
रामाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसेच उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी लावून धरली. यामुळे काही काळ ठाण्यात तणावाची स्थिती निर्माण झाली.
संतप्त नातेवाईकांची समजूत ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी काढण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधितांवर काय कारवाई करता येईल, असे नातेवाईकांना सांगण्यात आले. परंतु नातेवाईकांचे समाधान होत नव्हते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यासाठी दूरध्वनी करण्यात आला होता. परंतु वृत्तलिहिस्तोवर कुणीही आले नव्हे. या प्रकाराने राजूर कॉलरीच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. (प्रतिनिधी)