मृतदेह घेऊन नातेवाईक ठाण्यात
By Admin | Updated: March 27, 2017 01:18 IST2017-03-27T01:18:58+5:302017-03-27T01:18:58+5:30
आरोपीच्या अटकेची मागणी करत व्यापाऱ्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक रविवारी दुपारी बिटरगाव ठाण्यात धडकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मृतदेह घेऊन नातेवाईक ठाण्यात
व्यापाऱ्याचे खूनप्रकरण : संशयित बिटरगाव पोलिसांच्या ताब्यात
ढाणकी : आरोपीच्या अटकेची मागणी करत व्यापाऱ्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक रविवारी दुपारी बिटरगाव ठाण्यात धडकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिटरगाव येथील धान्य व्यापारी व्यंकटेश वसंतराव वट्टमवार (५०) यांचा शनिवारी सायंकाळी अज्ञातांनी खून केला होता. रविवारी शवविच्छेदनानंतर शववाहिनीतून मृतदेह थेट बिटरगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.
दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी व्यंकटेश वट्टमवार यांची पत्नी, मुलगा व इतर नातेवाईकांची समजूत काढली. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावरून नातेवाईकांनी मृतदेह घरी नेवून सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले.
वट्टमवार यांच्या निर्घृण खुनामुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण रविवारीही कायम होते.
दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या शिवाय मुख्य संशयित आरोपीबाबत पोलीस विविध माध्यमांतून तपास करीत आहे. संशयितांबाबत पोलिसांना धागेदोरे गवसले असल्याची माहिती असून नागरिकांनी सहकार्य केल्यास आरोपी पकडणे सोपे जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. (वार्ताहर)