पुनवटचे ग्रामसेवक निलंबित
By Admin | Updated: June 19, 2016 02:23 IST2016-06-19T02:23:41+5:302016-06-19T02:23:41+5:30
येथील पंचायत समितीअंतर्गत पुनवट व नायगाव (बु.) ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणारे ग्रामसेवक ए.एस. पाटेकर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १३ जून रोजी निलंबित केले.

पुनवटचे ग्रामसेवक निलंबित
वणी : येथील पंचायत समितीअंतर्गत पुनवट व नायगाव (बु.) ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणारे ग्रामसेवक ए.एस. पाटेकर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १३ जून रोजी निलंबित केले.
एस.एस. पाटेकर यांच्याकडे पुनवट व नायगाव (बु.) या दोन मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार होता. मात्र पाटेकर हे या दोनपैकी कोणत्याही गावात वास्तव्यात राहत नव्हते. तालुका स्तरावरून कारभार पाहत असताना दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये अनेकवेळा कर्तव्यात कसूर होत होता. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिक नाराज होते. पुनवट येथे सामान्य निधीच्या बांधकामामध्ये खोटे मस्टर भरून अपहार करण्यात आला. याची तक्रार पंचायत समिती सदस्य शरद ठाकरे यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती.
तसेच नायगाव (बु.) येथील रस्त्याच्या खडीकरण कामात अपहार झाल्याची तक्रार रामकृष्ण बोबडे व इतर गावकऱ्यांनी केली होती. या कामावरही चौकशी समिती नेमण्यात आली होती.
१३ व्या वित्त आयोगातून झालेल्या रस्त्याच्या बांधकामात मोठा गैरप्रकार झाल्याचे चौकशी समितीला आढळले. तसा अहवाल चौकशी समितीने गटविकास अधिकाऱ्यांना दिला. दोन्ही ठिकाणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालात पाटेकर हे दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाटेकर यांना तत्काळ निलंबित केले. त्यांना राळेगाव पंचायत समिती मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले. मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अवहेलना करणे, १५ टक्के मागासवर्ग, तीन टक्के अपंग व १० टक्के महिला व बालकन्या निधीवर खर्च न करणे आणि नायगाव (बु.) येथील १३वा वित्त आयोगातील कामामध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता असणे, हे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. या सर्व आरोपाची चौकशी होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)