पुनर्वसित शिरपूर आठ वर्षांपासून अंधारात

By Admin | Updated: September 11, 2014 23:51 IST2014-09-11T23:51:58+5:302014-09-11T23:51:58+5:30

शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही.

Rehabilitated Sharirpur for eight years in the dark | पुनर्वसित शिरपूर आठ वर्षांपासून अंधारात

पुनर्वसित शिरपूर आठ वर्षांपासून अंधारात

महागाव : शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील नागरिक अनंत यातना भोगत आहे.
महागाव तालुक्यातील शिरपूर हे शीप नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. २००६ साली अतिवृष्टी झाली. त्यात शीप नदीला महापूर आला. संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला. अनेक घरे पुरात वाहून गेली. नदी काठावर असलेल्या घरांचे पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नव्हता. तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे यांनी तीन दिवसात येथील पूरग्रस्तांना जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच पुनर्वसनाचा प्रस्तावही तयार केला. त्यानंतर नदी तीरावरील १०० घरांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र नागरी सुविधा देण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. गेल्या आठ वर्षांपासून या वस्तीत वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे.
या गावात शीप नदी ओलांडून प्रवेश करावा लागतो. नदीला पाणी असल्यास नागरिकांचे हाल होतात. १०० पक्की घरे बांधली असली तरी त्यांचे रितसर वाटप झाले नसल्याची माहिती आहे. डॉ. अरुण पाटील यांनी पुनर्वसित गावच्या नागरी सुविधा आणि मूलभूत सुविधा तत्काळ देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आणि खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनासुद्धा निवेदन दिले. मात्र गेल्या आठ वर्षात या गावातील समस्या सुटायला तयार नाही. नागरिक विविध समस्यांचा सामना करताना दिसतात. पावसाळ्याच्या दिवसात अंधारात चिखल तुडवित जावे लागते. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे लहान मुले आणि महिला तर घराच्या बाहेरही पडत नाही. निसर्गाने उद्ध्वस्त केले. मात्र प्रशासनाने आहे त्या स्थितीत सोडून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rehabilitated Sharirpur for eight years in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.