जिल्हा बँक : शून्य टक्के व्याज आणि दहा टक्के वाढीव कर्जाचा लाभ यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळ, नापिकी, माफी, थकबाकी याचे सावट असतानाही जिल्ह्यातील तब्बल ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करीत आहेत. त्यामुळे त्यांना शून्य टक्के व्याज आणि दरवर्षी दहा टक्के वाढीव कर्जाचा लाभ मिळतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी १ लाख ८० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करते. मात्र यातील अनेक शेतकरी दरवर्षीच शासन माफी देईल, कर्जाचे पुनर्गठण होईल या प्रतीक्षेत असतात. पर्यायाने ते थकबाकीदार होतात. जिल्हा बँकेचे तब्बल १ लाख २० हजार शेतकरी थकबाकीदार असले तरी ६० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारेही आहेत. या शेतकऱ्यांना थकबाकीदार होणेच मुळात आवडत नाही. कर्जाची वेळेत अर्थात पिकावर परतफेड करायचीच या इराद्याने ते दरवर्षी कर्ज घेतात आणि भरतातसुद्धा. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यासाठी नापिकी, दुष्काळ, कौटुंबिक गरजा, वाढलेला उत्पादन खर्च या सारखी कारणे सांगितली जात आहे. मात्र या कोणत्याही कारणांचा परिणाम उपरोक्त ६० हजार शेतकऱ्यांवर कधी झाला नाही. विपरीत परिस्थितीतही हे शेतकरी बँकेचे थकबाकीदार झाले नाहीत. दुष्काळातही त्यांचे अर्थचक्र प्रभावित झाले नाही. याच ६० हजार शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज परतफेडीवर बँकेचे इतरांच्या कर्ज वाटपाचे रोटेशन सुरू असल्याचे बँकेतून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थिती आणि ४६ टक्के पैसेवारीमुळे शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाला मुदतवाढ दिली आहे. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जाणार आहे. मात्र ६० हजार शेतकरी याचा लाभ घेत नाहीत. माफीच्या वर्षातही या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नियमित परतफेड केले. यात सधनच नव्हे तर सामान्य शेतकऱ्यांचीही संख्या बरीच मोठी असल्याचे सांगितले गेले. नियमित कर्ज भरणाऱ्या या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. शिवाय कर्जाच्या रकमेत १० टक्के वाढही केली जाते. तरीही बँकेचे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी ही कर्ज वसुली ३५० कोटींवर पोहोचली होती. यावर्षी ती १०० कोटींनी कमी होऊन अडीचशे कोटींवर येण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. एकट्या मार्च महिन्याच्या अखेरीस दीडशे कोटी रुपये वसूल होतील, असा बँकेचा अंदाज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दुष्काळातही ६० हजार शेतकऱ्यांची नियमित कर्ज परतफेड
By admin | Updated: December 24, 2014 23:06 IST