नोंदणीकृत मशीनधारकाने केला १४ लाखांचा गेम
By Admin | Updated: September 26, 2015 02:37 IST2015-09-26T02:37:27+5:302015-09-26T02:37:27+5:30
तालुक्यातील धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गौडबंगाल उघडकीस आल्याने खुद्द जिल्ह्याच्या ...

नोंदणीकृत मशीनधारकाने केला १४ लाखांचा गेम
दारव्हा : तालुक्यातील धामणगाव (देव) येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गौडबंगाल उघडकीस आल्याने खुद्द जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष पुरवून चौकशीअंती कृषी विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे प्रकरण ताजे असतानाच त्याच कामात एका नोंदणीकृत मशीनधारकाने अल्प काम करून १४ लाख रुपयांचा धनादेश नेल्याने त्याठिकाणी प्रत्यक्षात काम करणाऱ्या मशीनधारकाला हतबल होण्याची पाळी आली आहे.
कृषी विभागात तांत्रिक पद नसल्याची बाब पुढे करीत आवश्यकतेपेक्षा जास्त रकमेचे प्राकलन बनवून त्या कामात खोटी व जास्तीची मोजमापे मोजमाप पुस्तिकेत दाखवून आपले उखळ पांढरे करण्यात आतापर्यंत बऱ्याच अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यश मिळविले. परंतु तालुक्यातील धामणगांव (देव) येथील कामात चौकशीदरम्यान ही बाब उजेडात आल्याने वरिष्ठांनी एका कृषी सहाय्यक व एका पर्यवेक्षकाला निलंबित केल्याने कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या कामांची वरिष्ठ अधिकारी पाहणी करून ‘लेव्हल’व्दारे मोजमाप घेत असल्याने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्ंयाना ‘कमीशन’ पासून मुकावे लागले. ही बाब काही जुन्या अधिकाऱ्यांना न रुचल्याने कमीशन मिळविण्याची नवीन शक्कल दारव्ह्यात एका मशीनधारकाला हाताशी धरून करण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात रितसर सदर मशीनधारकाच्या संस्थेच्या नावाने नोंदणी करून ती मशीन धामणगांव (देव) येथे प्रत्यक्षात ६० ते ७० तास वापरण्यात आली. याच संस्थेच्या नावावर काम त्वरित पूर्ण करण्याकरिता दुसऱ्या नोंदणीकृत मशीनधारकाकडून तेथील काम पूर्ण करण्यात आले. मात्र यात आपला खिसा गरम करण्याकरिता तालुका कृषी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने शक्कल लढवून कामापोटी मिळालेला १४ लाख रुपयांचा धनादेश हा त्या संस्थाधारकाला अदा केल्याने मशीनधारकांत कमालीचा असंतोष पसरला आहे.
यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व धामणगांव (देव) येथील गावकरीसुद्धा कामे कोणत्या मशीनने केली याबाबत तोंडी सांगत असले तरी रेकॉर्डवर सदर संस्था असल्याने तेसुद्धा हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)