नरभक्षक वाघिणीची पुन्हा हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:56 IST2017-12-31T22:54:36+5:302017-12-31T22:56:23+5:30
अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नरभक्षक वाघिणीची पुन्हा हुलकावणी
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
वर्षभरापासून राळेगाव व केळापूर तालुक्यातील जंगलात नरभक्षक वाघिणीची दहशत आहे. वन विभागाने गोळा केलेल्या नमुन्यांवरून नरभक्षक वाघीण असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले. सध्या सखी, सावरखेडा, उमरी परिसरातील जंगलात वाघिणीचा संचार आहे. या वाघिणीला ट्रँगुलाईज करण्यासाठी २०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तीन महिन्यांपासून जंगल पालथे घालत आहे. गावकरी, शेतात काम करणाऱ्या मजुरांना अधूनमधून वाघिणीचे दर्शन होते. यातून लोकांचा रोष वाढत आहे. वाघिणीला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले असून शिकारीकरिता वगारी बांधल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी ही वाघीण शिकारीसाठी बांधलेल्या वगारीजवळ आल्याचे चित्र ट्रॅप कॅमेऱ्यातून घेण्यात आले. मात्र त्यानंतर तिचा माग काढताना वन विभागाच्या यंत्रणेला अनेक अडचणी आल्या.
पायांच्या ठशांवरून वाघिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०० अधिकारी-कर्मचारी तैनात असून त्यांच्या दिमतीला २५ वाहने आहे. आतापर्यंत हैद्राबाद, बंग्लोर, दिल्ली या विविध ठिकाणावरून वाघ पकडण्यात तरबेज शूटर व तज्ज्ञ येवून गेले. सध्या बंग्लोरचे एक्सपर्ट व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरू आहे. तीन ते चार महिन्यांपासून वाघिणीच्या शोधात यंत्रणा एकवटली आहे.
हिरवळीमुळे ट्रॅग्युलाईज करण्यास अडसर
जंगल हिवरेगार असून मोठ्या प्रमाणात झुडपं आहेत. यामुळे वाघीण दृष्टीपथास आली तरी ट्रँगुलाईज करताना अडचणी येत आहे हे जंगल सुमारे पाच हजार हेक्टर परिसरात असून लगतच्या शेतात पिके आहे. यामुळे वन विभागाच्या यंत्रणा व तज्ज्ञांना वाघिणीला शोधण्यात अडचणी येत असल्याचे वन्यजीव रक्षक डॉ.राजीव विराणी यांनी सांगितले. मानवी हालचाली टिपण्यातही ती यशस्वी ठरत असल्याचे सांगण्यात आले.