गॅस तपासणीच्या नावाखाली वसुली
By Admin | Updated: July 14, 2016 02:31 IST2016-07-14T02:31:52+5:302016-07-14T02:31:52+5:30
गॅस उपकरणांची कुठल्याही प्रकारे तपासणी न करता येथे ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे.

गॅस तपासणीच्या नावाखाली वसुली
ग्राहकांची दिशाभूल : तपासणीशिवाय तयार होतो अहवाल
यवतमाळ : गॅस उपकरणांची कुठल्याही प्रकारे तपासणी न करता येथे ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे. ‘उपकरण चेकिंग चार्ज’च्या नावाखाली रक्कम वसूल करण्यात येत आहे. येथे एका गॅस एजन्सीने सुरू केलेला हा प्रकार डोळ्यात धूळफेक करणारा आहे. गॅस तपासणी आणि शुल्काला ग्राहकांचा विरोध नाही. मात्र कुठलीही तपासणी न करता केवळ कागदावर ‘टीक’ मार्क करून उकळल्या जाणाऱ्या रकमेविषयी प्रचंड नाराजी आहे. पुरवठा विभागाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घरी गॅस सिलिंडर पुरविणारा व्यक्तीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करतो. गॅसविषयी त्याला किती ज्ञान आहे, हे एजन्सी चालकांनाच माहीत, पण त्याला मेकॅनिकल म्हणून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोबत असलेल्या एका कागदावर हो/नाही मध्ये माहिती भरावयाचा कागदावर तो स्वत:च टिक करतो. अर्धा एक मिनिटात त्याची दारातूनच तपासणी पूर्ण होते. पूर्ण २८ टिक झाल्यानंतर ग्राहकाच्या हाती कागद सोपवून रकमेची मागणी केली जाते.
सिलिंडरचा वापर कसा करावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे या दृष्टीने तपासणी आणि मार्गदर्शन या मेकॅनिककडून अपेक्षित आहे. पण त्याने स्वत: केलेल्या होय/नाही या टिक मजेशीर आणि नागरिकांची कशी दिशाभूल करणाऱ्या आहेत, हे दिसून येते. सिलिंडर सरळ ठेवले आहे, प्रेशर रेग्यूलेटरचा दाब ठिक आहे, रबर ट्यूबची लांब आवश्यक तेवढी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असे दिली जातात. एवढेच नाही तर स्वयंपाक घरात उजेड आहे, याचे उत्तरही नाही, असेच असते. ग्राहकाला रेग्यूलेटर चांगल्या प्रकारे लावता येते काय, याचेही उत्तर नाही असेच आहे. एवढे सर्व दोष असताना प्रत्यक्ष मार्गदर्शन किती केले जाते, हा प्रश्न आहे. त्याहीपुढे जाऊन आपत्तीकाळात काय करायला पाहिजे, याचेही उत्तर नाही असेच आहे.
खरंच एजन्सीकडून होणारी तपासणी सुरक्षेच्या दृष्टीने आहे, की रक्कम उकळण्यासाठी हा प्रश्न आहे. काहीही न करता होणारी रुपये वसुली ग्राहकांच्या संतापात भर टाकणारी आहे. या बाबी एजन्सीच्या संचालकांना माहीत नसाव्या याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या हितासाठी कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)