शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेतून वसुली
By Admin | Updated: June 9, 2017 01:44 IST2017-06-09T01:44:22+5:302017-06-09T01:44:22+5:30
नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेकडून शेतकऱ्यांची ५० टक्के विमा रक्कम कर्जस्वरूपात कापण्याचा प्रकार सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या विम्याच्या रकमेतून वसुली
उत्तरवाढोणा : महसूल राज्यमंत्र्यांकडून बँक अधिकाऱ्यांची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेकडून शेतकऱ्यांची ५० टक्के विमा रक्कम कर्जस्वरूपात कापण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून याबाबतची तक्रार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे करताच त्यांनी गुरुवारी शेतकऱ्यांसह या बँकेवर धडक देवून बँक अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
शेतकऱ्यांच्या विमा रकमेतून कर्जाची वसुली करणाऱ्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक बलजित कुमार यादव व जिल्हा अग्रणी प्रबंधक कैलास कुमरे या दोनही अधिकाऱ्यांना संजय राठोड यांनी एक तास चांगलेच धारेवर धरले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या समोरासमोर मांडल्या. शासनाकडून मिळालेला ५० टक्के पीक विमा यासोबतच शौचालयाचे अनुदान, निराधार अनुदान, घरकुलाचे अनुदान, रोहयोची मजूरी हे सर्व बँक खात्यात जमा झालेले पैसे ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज असेल त्यांच्या खात्यातून परस्पर वसुल करण्याचा प्रताप या बँकेकडून सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बँक अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून यापुढे जर मजूर व शेतकऱ्यांचे अनुदान-पीक विमा परस्पर कापण्यात आला तर सेंट्रल बँकेच्या या शाखेला कुलूप ठोकू अन्यथा शाखा व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास लावू, असा इशारा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिला.
यावेळी शेतकऱ्यांसोबतच नेरचे नायब तहसीलदार बंड, जिल्हा परिषद सदस्य भारत मेश्राम, निखिल पाटील जैत, वर्षा राठोड, उपसभापती समीर माहुरे, पंचायत समिती सदस्य मधुमती चव्हाण, सरपंच उज्ज्वला बुरड, निरंजन लांजेवार, अनिल चव्हाण आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लाडखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणवीर पोलीस ताफ्यासह उपस्थित होते.
शेतकऱ्यांना ५० टक्के विमा मिळालेली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा स्वरूपात ठेवून मागील कर्जाचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी थकित कर्जाचे नुतनीकरण करून दिले तर बँकेकडून वाढीव कर्ज देण्यात येईल.
- बलजित कुमार यादव, सेंट्रल बँक शाखा व्यवस्थापक, उत्तरवाढोणा