वसुली व गळतीचे आव्हान
By Admin | Updated: June 20, 2017 01:17 IST2017-06-20T01:17:37+5:302017-06-20T01:17:37+5:30
कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करणे आणि वीजेची गळती रोखणे हे आपल्या पुढील मुख्य आव्हान असल्याचे ...

वसुली व गळतीचे आव्हान
रामेश्वर माहुरे : थकबाकीमुळे वीज महावितरण अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करणे आणि वीजेची गळती रोखणे हे आपल्या पुढील मुख्य आव्हान असल्याचे प्रतिपादन वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वीच यवतमाळ वीज वितरण कार्यालयाच्या अधिक्षक अभियंता पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर माहुरे यांनी सर्वप्रथम विजेची दिवसेंदिवस वाढत चाललेली वसुली आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आरंभिले असल्याचे ते म्हणाले. सर्वप्रथम जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वीज देयकांच्या वसुलीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ४०६ घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख ६ हजार ८९७ रुपये थकबाकी आहे. व्यापारी ग्राहक १२ हजार ६४४ असून त्यांच्याकडे चार कोटी ३६ लाख ९७ हजार रुपये थकबाकी आहे. तर औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या २४८७ असून त्यांच्याकडे १ कोटी ३५ लाख आठ हजार १४४ रुपये थकबाकी आहे, या तीन प्रकारच्या वसुलीकडे लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. कृषी पंपाचीसुद्धा थकबाकी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. ७२३ कोटी ७८ लाख २० हजार ८७६ रुपये कृषी पंपाची थकबाकी आहे.
वसुली शिवाय वीज गळती कमी करण्याचेही मोठे आव्हान पुढील काळात महावितरणसमोर असणार आहे. सोबतच दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती व इंट्रिगेटेड पावर डेव्हलपमेंट स्किम या दोन महत्वाकांक्षी योजनांचेही काम सुरू झाले आहे. कृषीपंपाचेही हजारो अर्ज सध्या पेंडिग आहेत, या सर्व कामांना गती देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रामेश्वर माहुरे म्हणाले.
विद्युत मीटरचा तुटवडा नाही
घरगुती ग्राहकांसाठी वीज मीटरचा कोणताही तुटवडा नाही. तसेच नवीन वीज जोडणी घेताना पोलवर चढून केबल जोडणी करणे आणि सबंधित व्यक्तीच्या घरात मीटर फिट करणे, ही सर्व जबाबदारी महावितरणच्या सबंधित लाईनमनचीच आहे. याबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास त्या महावितरणच्या जिल्हा कार्यालयात कराव्या किंवा मुंबई मुख्यालयातील हेल्पपाईन नागरिकांसाठी जाहिर करण्यात आल्या आहेत, त्यावरसुद्धा या संदर्भातील तक्रारी कराव्या, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.