विविध कार्यालयातील रेकॉर्ड जीर्ण
By Admin | Updated: October 28, 2015 02:43 IST2015-10-28T02:43:25+5:302015-10-28T02:43:25+5:30
विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयातील जुने कागपत्रे महत्वाचा पुरावा असून ही कागदपत्रे आता जीर्ण झाले आहेत.

विविध कार्यालयातील रेकॉर्ड जीर्ण
नागरिक त्रस्त : हात लावला तरी कागदपत्रांचा पडतो तुकडा
दिग्रस : विविध प्रमाणपत्रांसाठी शासकीय कार्यालयातील जुने कागपत्रे महत्वाचा पुरावा असून ही कागदपत्रे आता जीर्ण झाले आहेत. शंभर वर्षापूर्वीच्या या कागदपत्रांना हात लावला तरी तुकडा पडतो. त्यामुळे या दस्तऐवजाचे संगणकीकरण करण्याची आवश्यकता असून तसे न झाल्यास रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती आहे.
महसूल कार्यालयासोबतच कोणत्याही कार्यालयात जुने रेकॉर्ड जपून ठेवले जाते. मात्र आता हे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. कागदपत्रांच्या गठ्ठांमधून व्यवस्थित कागद काढणे कठीण झाले आहे. अनेकांना जुन्या रेकॉर्डची गरज भासते. विविध दाखले, प्रमाणपत्र, फेरफार, नक्कल काढण्यासाठी जुने रेकॉर्ड उपयोगी पडते. एखाद्या नागरिकाने रेकॉर्ड फेरफारसाठी अर्ज सादर केल्यानंतर त्याला ते कागदपत्र देताना पाने फाटलेली आढळतात. त्या पानावरील रेकॉर्ड अस्पष्ट असेल तर नागरिकांना माहितीच मिळत नाही. अनेक शासकीय कार्यालयामध्ये रेकॉर्ड ठेवलेल्या खोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळेही जुने रेकॉर्ड खराब झाले आहे. त्यामुळे संबंधित रेकॉर्ड लिपिकाकडून नक्कल मिळविताना नाकीनऊ येतात. अनेकदा तर रेकॉर्ड जुने आहे, नक्कल मिळणार नाही, असे सांगितले जाते.
एखाद्याने १० वर्षापूर्वी रेकॉर्डची प्रत काढली असेल आणि पुन्हा तीच प्रत आता हवी असेल तर रेकॉर्ड जाग्यावरच आढळून येत नाही. परिणामी नेमके रेकॉर्ड कुठे गेले, त्यातील पानांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होतो. रेकॉर्ड गहाळ होण्यास संबंधित लिपीकही जबाबदार असतो. वर्षभरात अनेक लिपिकांच्या हातून रेकॉर्ड गेलेले असते. पाने चाळताना जीर्ण पाने फाटतात.
या कागदपत्रांचा चुराडा होतो. मात्र त्याचे कुणालाही देणे-घेणे नाही. नागरिकांना रेकॉर्ड मिळत नसल्याने त्यांना मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. (प्रतिनिधी)