‘आरबीएस’ने लावला अनेकांना चुना
By Admin | Updated: August 14, 2014 00:07 IST2014-08-14T00:07:27+5:302014-08-14T00:07:27+5:30
सात हजार २०० रुपयांची पाच वर्षात तीन लाख १९ हजार रुपये देण्याचे आमिष देऊन पुण्यातील आरबीएस मल्टीकेअर प्रा.लि. कंपनीने महागाव तालुक्यातील शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचे पुढे आले आहे.

‘आरबीएस’ने लावला अनेकांना चुना
महागाव : सात हजार २०० रुपयांची पाच वर्षात तीन लाख १९ हजार रुपये देण्याचे आमिष देऊन पुण्यातील आरबीएस मल्टीकेअर प्रा.लि. कंपनीने महागाव तालुक्यातील शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचे पुढे आले आहे. कंपनीने दिलेले धनादेश अनादरीत झाल्याने ग्राहकांनी महागाव पोलिसात धाव घेतली. मंगळवारी उशिरा रात्री कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे येथील आरबीएस मल्टीकेअर प्रा.कंपनीने तालुक्यातील अनेकांना भरघोस परतावा देण्याचे आमिष दिले. २००९ पासून सदर कंपनी ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत होती. सुरुवातीला सात हजार २०० रुपये भरले की, पाच वर्षाने तीन लाख १९ हजार रुपये परत देण्यात येतील, असे सांगण्यात येत होते. एवढेच नाही तर कंपनीचे अधिकारी महागाव येथे येऊन प्रोजेक्टरद्वारे आपल्या कंपनीची माहिती देत होते. या भूलथापांना बळी पडून अनेकांनी त्यात पैसे गुंतविले. परंतु मुदत संपल्यानंतर परतावा घेण्याची वेळ आली त्यावेळी दिलेले धनादेश वटलेच नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. ग्यानबा एकनाथ बुटे, अनंता नागरगोजे यांना कंपनीने प्रत्येकी पाच लाख रुपयाचा एचएचबीसी बँकेचा धनादेश दिला होता. तर अशोक तांंदळे यांना चार लाख रुपयांचा आणि संतोष गुट्टे यांना १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र ग्यानबा बुटे यांना दिलेला पाच लाखांचा धनादेश वटला नाही. त्यामुळे ग्यानबा बुटे, अनंता नागरगोजे, अशोक वाल्मिक इंगळे रा. महागाव, संतोष भगवान बुटे रा. बुटेवाडी जि.बीड यांनी काल रात्री महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून कंपनीचे संचालक रमेश बुधवाले व इतर संचालकांविरुद्ध भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महागावचे ठाणेदार अरुण आगे यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले आहे. आरोपींंना अटक झाल्यानंतर सत्य बाहेर येईल. (शहर प्रतिनिधी)