यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 20:31 IST2018-06-17T20:31:28+5:302018-06-17T20:31:28+5:30
दुकानासमोरून जात असताना आरोपींनी तिला उचलून नेऊन एका पडिक गोठ्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
यवतमाळ : तालुक्यातील खरोला येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. दोन महिन्यापूर्वी या आरोपींनी मुलीला उचलून नेऊन अत्याचार केला होता. मात्र, तेव्हा जीवाच्या भीतीने तिने तक्रार दिली नाही. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
करण प्रल्हाद पशेरिया (१९), राजेश रामपाल उमरे (२१) रा. खरोला अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. रविवारी दुपारी पीडित मुलगी दुकानासमोरून जात असताना आरोपींनी तिला उचलून नेऊन एका पडिक गोठ्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने कशीबशी तेथून सुटका करून घेतली. यानंतर वडिलांच्या मदतीने ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दोन महिन्यापूर्वीसुद्धा या आरोपींनी पीडित मुलीला मैत्रिणीच्या घरुन परत येत असताना उचलून नेऊन जंगला लगतच्या शेतात अत्याचार केल्याची आपबिती कथन केली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (२), ३६३, ३५४, ५०४, ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील सहकलम ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, त्या मुलीने वैद्यकीय तपासणी करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.