माजी आमदाराविरुद्ध खंडणी, मारहाणीचा गुन्हा
By Admin | Updated: July 14, 2016 02:31 IST2016-07-14T02:31:09+5:302016-07-14T02:31:09+5:30
उमरखेड येथील भाजपाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे

माजी आमदाराविरुद्ध खंडणी, मारहाणीचा गुन्हा
वन परिक्षेत्र अधिकारी : पुसदमध्ये गुन्हा दाखल
पुसद : उमरखेड येथील भाजपाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे ५० हजार रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा येथील वसंतनगर ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आला.
वन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी दुपारी येथील वन विभागीय कार्यालयात सुरू होती. दरम्यान उत्तमराव इंगळे तेथे आले. त्यांनी डीएफओ कमलाकर धामगे यांच्याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी किसनराव तरटेकर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली. यावेळी इंगळे यांना चौकशी करण्याचे आश्वासन दिले. परंतु यावर समाधान न झाल्याने त्यांनी तरटेकर यांच्या अंगावर धाऊन जाऊन शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंगळे यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली, ती पूर्ण न केल्याने त्यांनी अशाप्रकारे वचपा काढल्याचे तरटेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोप फेटाळले
या प्रकरणी उत्तमराव इगळे यांनी सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, आपण २५ वर्षांपासून राजकारणात असून कुणाला ५० हजार कशाला मागू, तेवढे पैसे तर आपण गरजू कार्यकर्त्याला देतो. उमरखेड येथील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या बाबात आपणाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो होतो. वन विभागात भ्रष्टाचार असून त्याची लिंक आरएफओ सह सबंधित डीएफओ आणि यवतमाळ सीसीएफ गुरमे यांच्यापर्यंत असल्याचा आरोपही उत्तमराव इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. (प्रतिनिधी)