रॅलीला विलंब अन् नामांकनाचा मुहूर्त हुकला
By Admin | Updated: October 8, 2015 02:11 IST2015-10-08T02:11:46+5:302015-10-08T02:11:46+5:30
नगरपंचायती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेली रॅली विलंबाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्याने भाजपाच्या उमेदवारांना .....

रॅलीला विलंब अन् नामांकनाचा मुहूर्त हुकला
राळेगावातील प्रकार : भाजपाच्या इच्छुक उमेदवारांना लागली हुरहूर
राळेगाव : नगरपंचायती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेली रॅली विलंबाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्याने भाजपाच्या उमेदवारांना मंगळवारी नामांकन अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहावे लागले. शुभमुहूर्त हुकल्याने उमेदवारांमध्ये हुरहूर दिसत होती. मात्र नामांकनाला दोन दिवस असल्याने दिलासा मिळाला.
राळेगाव येथे नगरपंचायतीच्या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष शक्ती प्रदर्शन करीत आहे. भारतीय जनता पक्षानेही शक्तिप्रदर्शन करीत नामांकन दाखल करण्यासाठी रॅलीचे मंगळवारी आयोजन केले होते. तत्पूर्वी येथील विठ्ठल मंदिर सभागृहात कार्यकर्ते आणि उमेदवारांची सभा आयोजित केली होती. या सभेला भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, प्रफुल्ल चव्हाण, मनोज इंगोले, सुरेश पोटदुखे, भालचंद्र कविश्वर आदी उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्ते व उमेदवारांना मान्यवरांनी संबोधित केले. त्यानंतर नामनिर्देशन पत्र निवडणूक कार्यालयात दाखल करण्याकरिता शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली निघाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घर, दुकान आणि प्रतिष्ठानातील नागरिकांना अभिवादन करीत ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचली.
भाजपाच्या अनेक उमेदवारांनी आपले नामांकन दाखल करण्यासाठी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंना देण्याची तयारी केली. परंतु उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ संपल्याचे कारण सांगत अर्ज स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे उमेदवार, कार्यकर्ते, नेते नाराज होऊन माघारी परतले. यातील अनेक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शुभमुहूर्त काढून ठेवला होता. विलंब झाल्याने त्यांचा शुभमुहूर्तही हुकला. त्यामुळे अनेक उमेदवार हुरहूर व्यक्त करीत होते. काही कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्याची वेळ ५ वाजेपर्यंत असल्याचा गैरसमज असल्याने उशीर झाल्याचे सांगून वेळ मारुन नेली. त्यानंतर यातील बहुतांश उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. गुरुवार शेवटचा दिवस असून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सायंकाळी ५.३० पर्यंत वेळ वाढवून दिला असल्याचे उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी जे.आर. विधाते यांंनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात ३०६ नामांकन दाखल
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी ३०६ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात सर्वाधिक नामांकन राळेगाव येथे ९५ आहे. या निवडणुकीसाठी झरीजामणी येथे १८, कळंब ५३, मारेगाव ७४, महागाव ३८ आणि बाभूळगाव येथे २८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची ८ आॅक्टोबर ही शेवटची तारीख असून गुरुवारी एकाच दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी होणार आहे. त्यातच नामांकन आॅनलाईन भरावे लागत असल्याने लिंकही मिळत नसल्याची ओरड होत आहे. नामांकन दाखल करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असून प्रशासन शेवटच्या दिवशी काय उपाययोजना करते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.