राळेगावकर रस्त्यावर

By Admin | Updated: October 3, 2016 00:21 IST2016-10-03T00:21:07+5:302016-10-03T00:21:07+5:30

शहरातील सर्वात जुने आणि कार्यप्रसंगासाठी उपयोगात येणारे लोकमान्य सभागृह पाडण्याला विरोध दर्शवित रविवारी शहरवासी रस्त्यावर उतरले.

On Ralegaonkar road | राळेगावकर रस्त्यावर

राळेगावकर रस्त्यावर

बंद कडकडीत : लोकमान्य सभागृह पाडण्याला विरोध
राळेगाव : शहरातील सर्वात जुने आणि कार्यप्रसंगासाठी उपयोगात येणारे लोकमान्य सभागृह पाडण्याला विरोध दर्शवित रविवारी शहरवासी रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांनीही साथ देत आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांना देण्यात आले.
लोकमान्य सभागृह सर्वसामान्य नागरिकांकडील कार्यप्रसंग तसेच छोट्या मोठ्या कामांसाठी उपयोगात आणले जात आहे. दरम्यान, सदर सभागृह पाडून त्याठिकाणी नगरपंचायतीचे अद्यावत कार्यालय बांधण्याचा ठराव नगरपंचायतीने घेतला. सभागृह पाडल्यास गरिबांना कार्यप्रसंगासाठी महागडे स्थळ भाड्याने घ्यावे लागेल. ही भूमिका मांडत अपक्ष नगरसेवक शशीकांत धुमाळ यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला. मात्र नगरपंचायत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात घेत रविवारी धुमाळ यांच्या नेतृत्त्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शिवाय शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. महिलांचा यामध्ये सहभाग होता.
लोकमान्य सभागृह जनतेसाठी खुले करावे, ही वास्तू पाडू नये यासह शहरातील स्वच्छता नियमित ठेवावी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, मोकाट कुत्रे, डुकरं आणि जनावरांचा बंदोबस्त करावा, नळ जोडण्या विनाशुल्क द्याव्या आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान अन्याय प्रतिकार मंचचे जानराव गिरी, शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे, शहर प्रमुख राकेश राऊळकर, पद्माकर ठाकरे, पंचायत समिती उपसभापती सुरेश मेश्राम, संदीप पेंदोर, गजानन ठुणे, मधुकर राजूरकर, लीला पेंदोर, लता भोयर, ताई खंदारे आदींनी आंदोलनाची भूमिका मांडली. दरम्यान, शहराची शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी अतिरिक्त पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. ठाणेदार अरुण आगे, सहायक ठाणेदार अशोक सोळंकी हे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. बाळू धुमाळ, जानराव गिरी यांनी डॉ. विकास खंडारे यांना निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)

Web Title: On Ralegaonkar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.