राळेगावला वादळाचा तडाखा
By Admin | Updated: June 14, 2015 02:38 IST2015-06-14T02:38:18+5:302015-06-14T02:38:18+5:30
पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळाने शुक्रवारी राळेगावात थैमान घातले. जवळपास एक तास शहराला या आपत्तीने ...

राळेगावला वादळाचा तडाखा
एक तास थैमान : वृक्ष कोसळले, झोपड्या भूईसपाट, आर्थिक नुकसान
राळेगाव : पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळाने शुक्रवारी राळेगावात थैमान घातले. जवळपास एक तास शहराला या आपत्तीने झोडपून काढले. मोठमोठी जुनी वृक्ष कोसळल्यामुळे टीनपत्रांच्या दुकानांसह घरे आणि कार्यालये क्षतिग्रस्त झाली. १० ते १५ मोठी वृक्ष उन्मळून पडले. या घटनांमध्ये झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जाते.
सायंकाळी ६.३० वाजता पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळाला सुरुवात झाली. जोरदार हवेमुळे पडलेले झाड ग्रामीण रुग्णालयाच्या अॅम्बुलन्सवर कोसळले. यात या रुग्णवाहिकेचे नुकसान झाले. हिरासिंग मुणोत यांच्या वाड्यावरील टीनपत्रे रस्त्यावर जावून पडल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. जिल्हा बँक शाखेच्या प्रवेशद्वारावर झाड पडले. वसंत जिनिंग ते वर्धा बायपास मार्गावर असलेल्या लघु व्यावसायिकांच्या दुकानांवरील शेड उडून रस्त्यावर पडले. नगरपंचायत लगतचे झाड दुकानांवर कोसळले. शारदा जनरल स्टोअर्सला पडलेल्या झाडामुळे नुकसानीची झळ पोहोचली. मुलांच्या प्राथमिक शाळेलाही पडलेल्या झाडामुळे क्षती पोहोचली. (प्रतिनिधी)
५० घरांवरील टिनपत्रे उडाली
स्थानिक फुकटनगर या भागातील झोपडीवजा घरांनाही वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. ५० घरांवरील टिनपत्रे उडाली. तेथे राहणाऱ्या लोकांना इतर ठिकाणाचा आसरा घ्यावा लागता. कुणालाही दुखापत झाली नाही. काही ठिकाणी लोखंडी खांब वाकले. अनेक भागातील वीज तारा तुटल्याने संपूर्ण शहर अंधारात होते. उडालेले टीनपत्र विद्युत खांबांवर अडकून पडले. भ्रमणध्वनी आणि टेलिफोन सेवाही ठप्प पडली.