राळेगाव पंचायत समिती व तहसीलमध्ये शिस्तीची ‘वाट’
By Admin | Updated: February 20, 2016 00:17 IST2016-02-20T00:17:10+5:302016-02-20T00:17:10+5:30
येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे.

राळेगाव पंचायत समिती व तहसीलमध्ये शिस्तीची ‘वाट’
व्यवस्थेकडे दुर्लक्ष : नागरिकांना द्यावे लागते अडचणींना तोंड
राळेगाव : येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे. यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालय परिसरात कोणतीच शिस्त नसल्याचेही दिसून येत आहे. या सर्वांची जबाबदारी असणारा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यात कधी लक्ष घालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या परिसरात शासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची वाहने शिस्तीत लावण्यासाठी कोणतीच निश्चित जागा ठरविण्यात आलेली नाही. वाहने कोठेही उभी केली जात आहे. तोच प्रकार नागरिकांच्या वाहनांच्या बाबतीतही आहे. अगदी तहसीलदारांच्या कक्षासमोरच लहान मोठी वाहने दिवसभर येत-जात असतात व उभी केली जातात. अशीच स्थिती पंचायत समिती सभागृहासमोर निर्माण होते. या परिसराला असलेले दोनही दरवाजे कंडम झाल्याने कुचकामी ठरले आहे. तारेचे कूंपन अनेक ठिकाणी तुटलेले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या दुकानांमध्ये तुटलेल्या कुंपनातून मार्ग काढला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिसरातील या दोनही इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. दररोज विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे. नागरिकांसाठी तर हॉटेल व चहा टपरीचाच आधार आहे.
गौण खनिज चोरीतील वाहनेही याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली जातात. निश्चित जागा व सुरक्षा नसल्याने ही वाहने केव्हाही उचलून नेण्याचा धोका नेहमी राहत असतो. तहसील कार्यालय व पंचायत समितीचे इतर विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी दूरवर झाले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नेमक्या ठिकाणी जावून आपले काम करून घेणे वेळोवेळी कठीण होते. त्यांच्या माहितीसाठी सुयोग्य मार्गदर्शक फलक नाही. या महत्त्वपूर्ण विभागाची सुरक्षाही सुरक्षा भिंतीअभावी धोक्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह इतर संबंधितांनी यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावी, अशी अपेक्षा नागरिकांसह अधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रार
पंचायत समिती कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली. याठिकाणी विद्युत कंपनीनेही संबंधितांना वीज पुरवठा केला आहे. या सर्व बाबींमुळे तहसील व पंचायत समिती विभागाला मोठ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.