रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेचा फज्जा
By Admin | Updated: June 29, 2015 00:25 IST2015-06-29T00:25:26+5:302015-06-29T00:25:26+5:30
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे बंधनकारक आहे.

रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेचा फज्जा
नियम कागदावर : हजारो लिटर पाणी रस्त्यावर
पुसद : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने छतावरील पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे बंधनकारक आहे. एवढेच नव्हे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अटीवरच नवीन घराच्या बांधकामाला परवानगी मिळते, मात्र कागदावर असलेले हे नियम प्रत्यक्ष कृती उतरवण्याबाबत कमालीची उदासीनता दिसून येतेच.
पूर्वी हातपंप व विहिरीची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे भूजल पातळी आजच्या एवढी खालावत नव्हती. अगदी पाच-दहा फुटावर विहिरीत भरपूर पाणी राहत असे. परंतु अलिकडील काळात हातपंप व विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने भूगर्भातील पाण्याचा उपसा सतत होत असतो. त्या तुलनेत भूजल पातळी वाढ व्हावी हा सकारात्मक दृष्टीकोण समोर ठेऊन शासनाने शहरातील शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारती, नवीन बांधकामांना रेन हार्वेस्टिंग करणे आवश्यक केले.
पाच वर्षापूर्वी या योजनेसंदर्भात मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्या दृष्टीने शहरातील शासकीय विश्रामगृह, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम, सिंचन विभाग, न्याय मंदिर आदी कार्यालयामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था काही ठिकाणी करण्यात आली होती. जेणे करून पावसाचे छतावरून पडणारे पाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी जमिनीत मुरावे ही संकल्पना अस्तित्वात आणली. मात्र अल्पावधीतच या रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाचे पाईप फुटले तर काही साहित्य लंपास झाल्याचे दिसून येत आहे.
काही विभागांनी तर या योजनेची अंमलबजावणी केलीच नाही. त्यामुळे शासनाने या उदात्त हेतूने ही योजना राबविण्यास प्रवृत्त केले. त्या उद्देशाला तडे गेले आहे. तसेच याबाबत शासकीय कार्यालयाकडून पाणी बचतीचे महत्व लक्षात आणून देण्यास प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आगामी काळात पावसाचे पडणारे पाणी गावातच न मुरता गावाबाहेर वाहून जाईल.
परिणामी भविष्यात भूजल पातळीत कमालीची घट होऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. या उपक्रमाबाबत जनजागृती केल्यास रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून गावातले पाणी गावातच राहील व भूजल पातळी वाढण्यात भर पडेल. मात्र याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधींना या योजनेचा विसर पडल्याने योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पाहावयास मिळत आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रशासनाच्यावतीने हवी तशी प्रसिद्धी केली जात नाही. त्यामुळे नागरिकही रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या भानगडीत पडत नाही. (तालुका प्रतिनिधी)