७३ दिवसांत १६ दिवस पाऊस
By Admin | Updated: August 13, 2014 00:02 IST2014-08-13T00:02:00+5:302014-08-13T00:02:00+5:30
गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात

७३ दिवसांत १६ दिवस पाऊस
महागाव : गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात आतापर्यंत २१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया असून शेतकरी हवालदिल झाले आहे.
गतवर्षी महागाव तालुक्यात एकही दिवस असा जात नव्हता की पाऊस आला नाही. पावसाला थांब म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सततच्या पावसाने शेतामधील पिके उद्ध्वस्त झाली होती. अनेक शेतात तर १५-१५ दिवस गुडघाभर पाणी होते. अतिवृष्टीने गतवर्षीचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यानंतर रबी हंगामात गारपीट आली. यातही प्रचंड नुकसान झाले. यावर्षी सुरुवातीला हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मशागत करून पेरणीची तयारी केली. मात्र आकाशात ढग दिसतच नव्हते. मृग, रोहिणी, आर्द्रा आदी पावसाचे नक्षत्र कोरडे गेले. अशा स्थितीत धूळ पेरणी केलेले शेतकरी उद्ध्वस्त झाले. मध्यंतरी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यांच्यावरही दुबार पेरणीची वेळ आली. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कुठेही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके धोक्यात आली आहे.
महागाव तालुक्यात गतवर्षी ५४ दिवसात १४०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा पाऊसच यायला तयार नाही. जुन-जुलै आणि आॅगस्ट अर्धा महिना निघून गेला. पावसाच्या ७३ दिवसांपैकी केवळ १६ दिवस पाऊस कोसळला. यामुळे तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया आहे. शेतातील पिके सुकली असून नदी-नालेही कोरडे आहे. या भीषण टंचाईचा फटका जनावरांनाही बसत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. महागाव शहराला दरडोई ४० लिटर पाणी याप्रमाणे तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंंतु एवढे पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून महागावची पाणीपुरवठा योजना बंद आहे. अशा स्थितीत पाऊस आला नाही तर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृती आराखडा उन्हाळ्यात मंजूर केला. मात्र त्यातील उपाययोजना करण्यातच आल्या नाही. (शहर प्रतिनिधी)