जिल्ह्याला पुन्हा पावसाचा तडाखा
By Admin | Updated: March 2, 2016 02:45 IST2016-03-02T02:45:03+5:302016-03-02T02:45:03+5:30
जिल्ह्याला अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. महागाव तालुक्याला वादळी पावसाचा जबर तडाखा बसला.

जिल्ह्याला पुन्हा पावसाचा तडाखा
महागावला सर्वाधिक : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्ग ठप्प
यवतमाळ : जिल्ह्याला अवकाळी पावसाने सलग तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. महागाव तालुक्याला वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावर मोठमोठ्ठाले वृक्ष उन्मळल्याने वाहतूक ठप्प झाली. आर्णी तालुक्यातील लोणबेहळ परिसरात जोरदार पाऊस कोसळला.
जिल्ह्यात शनिवारपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने रबी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. उमरखेड, महागाव तालुक्याला फटका बसला. रविवारी जिल्ह्यातील विविध भागात तुरळक पाऊस झाला. महागाव तालुक्यात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अचानक चक्रीवादळासारखे वादळ सुरू झाले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वृक्ष उन्मळून पडली. धनोडा ते हिवरा दरम्यान ५० ते ६० वृक्ष कोसळल्याची माहिती आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वादळाने अनेक घरांवरील टीनपत्रे उडाले असून अंबोडा येथील यात्रेलाही याचा फटका बसला. मोहदी आणि गुंज परिसराला वादळाचा तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले.
यवतमाळ शहरात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अचानक टपोर थेंबाच्या पावसाला प्रारंभ झाला. या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्न-स्वागत समारंभाला मोठा फटका बसला. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसाचा सर्वांनीच धसका घेतला. (शहर वार्ताहर)