तोतया रेल्वे अधिकाऱ्याने ३० जणांना फसविले

By Admin | Updated: December 16, 2015 02:44 IST2015-12-16T02:44:14+5:302015-12-16T02:44:14+5:30

ग्रामीण भागातील तरुणांना हेरून रेल्वेत नोकरीत लावण्याचे आमिष देणाऱ्या तोतया रेल्वे अधिकाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत.

The Railway Railway Officer misbehaved with 30 people | तोतया रेल्वे अधिकाऱ्याने ३० जणांना फसविले

तोतया रेल्वे अधिकाऱ्याने ३० जणांना फसविले

तीन दिवसांची कोठडी : नोकरी लावून देण्याचे दिले आमिष
उमरखेड : ग्रामीण भागातील तरुणांना हेरून रेल्वेत नोकरीत लावण्याचे आमिष देणाऱ्या तोतया रेल्वे अधिकाऱ्याला उमरखेड पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. या ठकसेनाने विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणातील तब्बल ३० जणांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या तोतया रेल्वे अधिकाऱ्याला तीन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
उमरखेड पोलिसांनी नामदेव विठ्ठल खानझोडे रा.धोत्रा ता.हदगाव जि.नांदेड याला बाळदी येथून शनिवारी रात्री अटक केली. त्याने परिसरातील अनेक तरुणांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. एका तरुणाच्या सतर्कतेने नामदेव पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी आपला हिसका दाखविताच त्याने आतापर्यंत फसवणूक केलेली प्रकरणे सांगितली. तालुक्यातील चालगणी येथील राजू विणकरे याच्यासह १० जणांना गाठून रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्यासाठी हजारो रुपये घेतले. परंतु नोकरी दिली नाही. या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी नामदेवची चौकशी सुरू केली. त्यात त्याने ३० जणांची फसवणूक केल्याचे पुढे आले.
हा तोतया रेल्वे अधिकारी विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणातील ग्रामीण भागात जावून तरुणांना फसवित असल्याचे पुढे आले. उमरखेडपासून थेट तेलंगणापर्यंत त्याचे नेटवर्क असल्याचे उघडकीस आले. त्याने तोतया अधिकारी बनून अदिलाबाद येथील शेख जमीर शेख पाशा, शेख शम्मी, शेख तौफिक यांच्यासह बाळदी येथील दगडू वानखडे, निंगनूर येथील बळीराम जंगले, सुदाम साखरे, बालाजी जंगले, झाडगावचे भगवान कस्तुरे, शेख मुस्तफा शेख माजीद, शुद्धोधन श्रवले, संदीप श्रवले, प्रियंका भोसले, किशोर ठाकरे, सीमा ठाकरे यांचीही फसवणूक केल्याचे पुढे आले. दरम्यान, त्याला अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर केले असता १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)

एक तरुणीही ताब्यात
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे सुरू होणार असून त्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष तोतया रेल्वे अधिकारी नामदेव खानझोडे देत होता. त्याला सहकार्य करणाऱ्या बाळदी येथील एका तरुणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी मनोज मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

Web Title: The Railway Railway Officer misbehaved with 30 people