नगरपरिषदेमध्ये झाला ‘राडा’
By Admin | Updated: May 30, 2015 02:30 IST2015-05-30T02:30:38+5:302015-05-30T02:30:38+5:30
येथील नगरपरिषदेमध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड ‘राडा’ घडून आला.

नगरपरिषदेमध्ये झाला ‘राडा’
वणी : येथील नगरपरिषदेमध्ये शुक्रवारी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत प्रचंड ‘राडा’ घडून आला. यामध्ये मनसेच्याच नगरसेवकांनी एकमेकांना हाणामारी केली, तर महिला नगरसेवकांना शहरातील काही महिलांनी येऊन मारझोड केल्याची घटना घडली.
वणी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी १ वाजता ठेवण्यात आली होती. ती वेळेवर सुरू झाली. काही विषय आटोपल्यानंतर येथील तलाव पाळीवरील नाल्याचा विषय पटलावर आला. या विषयावरून नगरसेवकांमध्ये वादावादी झाली. सदर नाला वळवून दुसरीकडून नेण्याची मागणी काही नगरसेवक व नागरिकांनी केली होती. मागील सर्वसाधारण सभेत या विषयावर चौकशी समिती नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे ठरले होते. चौकशी समितीने काहीच केले नाही, असे म्हणून नगरसेवक अभिजीत सातोकर यांनी सभेत आवाज काढला. त्यावर आरोग्य सभापती धनंजय त्र्यंबके यांनी सांगितले की, चौकशी समितीने चौकशी केली असून अहवाल प्राप्त होताच त्यावर कारवाई केली जाईल. मात्र यामुळे अभिजीत सातोकर याचे समाधान झाले नाही. त्यांनी सरळ धनंजय त्र्यंबके यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
उपस्थित काही नगरसेवकांनी यात मध्यस्थी करून त्र्यंबके यांना दुसऱ्या दालनात नेऊन बसविले. त्याच दालनात सर्व १३ महिला नगरसेविकाही सुरक्षिततेच्या दृष्टीने बसल्या होत्या. एवढ्यातच बाहेरून २० ते २५ महिलांचे टोळके सभागृहात शिरले. त्यांनी धनंजय त्र्यंबके व महिला नगरसेविका बसून असलेल्या दालनाचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यांनी महिला नगरसेवकांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यात नगरसेविका आशाताई टोंगे, कीर्ती देशकर, अर्चना थेरे, पुष्पा कुळसंगे यांना मारहाण करून अर्वाच्च शिविगाळ केली. यानंतर सभा तहकूब करण्यात आली. दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
हजन परवीन बानो (४०) या महिलेच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांनी ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात नगराध्यक्ष प्रिया लभाने, धनंजय त्र्यंबके व अर्चना थेरे यांनी ढकलून दिल्याने पायाला मार लागल्याचे त्यांनी म्हटले. दुसऱ्या बाजूने नगराध्यक्ष प्रिया लभाणे, आरोग्य सभापती धनंजय त्र्यंबके यांनीही नगरसेवक अभिजित सातोकर व सिद्दीक रंगरेज यांनी महिलांना अर्वाच्च व जातीवाचक शिविगाळ केल्याची तसेच महिला नगरसेविकांना मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.
मुख्याधिकारी गोपिचंद पवार यांनी नगरपरिषदेच्या सामानाची नासधूस व नुकसान केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. नगरपरिषदेत शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे आता नगरपरिषद कुस्तीचा आखाडा बनल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून आता व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)