वादळी पावसात रबी उद्ध्वस्त
By Admin | Updated: February 13, 2015 01:57 IST2015-02-13T01:57:10+5:302015-02-13T01:57:10+5:30
खरीप हंगामाच्या प्रारंभापासून सुरू असलेली निसर्ग प्रकोपाची मालिका थांबायला तयार नाही. मंगळवारी रात्री पुन्हा महागाव तालुक्याला निसर्ग प्रकोपाचा तडाखा बसला.

वादळी पावसात रबी उद्ध्वस्त
महागाव : खरीप हंगामाच्या प्रारंभापासून सुरू असलेली निसर्ग प्रकोपाची मालिका थांबायला तयार नाही. मंगळवारी रात्री पुन्हा महागाव तालुक्याला निसर्ग प्रकोपाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि वादळाने तब्बल अडीच हजार हेक्टरवरील गहू आणि रबी ज्वारीचे नुकसान झाले. शेवटची आशाही मावळल्याने शेतकरी आता हतबल झाल्याचे दिसत आहे. एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाने मात्र अद्यापही दखल घेतल्याचे दिसत नाही.
महागाव तालुक्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात ओंब्यावर आलेला गहू पूर्णत: झोपला. तर रबीतील हुरड्यावर आलेली ज्वारीही भूईसपाट झाली. महागाव तालुक्यात यावर्षी कृषी विभागानुसार चार हजार हेक्टर गहू तर एक हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. मंगळवारच्या पावसात दोन हजार हेक्टरवरील गहू आणि ५०० हेक्टरवरील ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोणत्याही शेतात नजर टाकली तरी आडवा झोपलेला गहू दिसून येतो. हाताशी आलेला गहूही निसर्ग प्रकोपात उद्ध्वस्त झाला आहे.
यंदा तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी ज्वारीची लागवड केली होती. यातून वैरणाचा प्रश्नही सुटणार होता. परंतु हुरड्याव आलेल्या ज्वारीलाही मोठा तडाखा बसला.
खडका, हिवरा, लेवा, गुंज, माळकिन्ही, शिरपूर, करंजी, पोहंडूळ, महागाव, मुडाणा, फुलसावंगी यासह प्रत्येक गावात मोठे नुकसान झाले आहे. नुकसान होऊन दोन दिवस झाले तरी प्रशासनाचा कोणताही अधिकारी, कर्मचारी सर्वेक्षणासाठी तालुक्यात आला नाही. हतबल झालेले शेतकरी तहसील आणि कृषी विभागात माहिती देण्यासाठी जात आहे. परंतु त्यांचे कुणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे या अवकाळी पावसात तालुक्यात नेमके किती नुकसान झाले हे कळायला मार्ग नाही. यावर्षी अपुऱ्या पावसाने सोयाबीन आणि कपाशी उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांची आशा रबी पिकावर होती. मात्र या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फेरले. (तालुका प्रतिनिधी)
आंब्याचा मोहर गळला
दिग्रस : यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याला मोहर आला होता. मोहराने आंब्याचे पानही दिसत नव्हते. परंतु मंगळवारी झालेल्या अकाली पाऊस आणि वादळाने आंब्याचा मोहर गळून पडला आहे. तसेच संत्रा आणि लिंबू पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
माळपठारावर वादळाचे तांडव
बेलोरा : पुसद तालुक्यातील माळपठारावर मंगळवारी रात्री जोरदार वादळ झाले. या वादळाच्या तांडवात गहू, हरभरा आणि तूर पिकाचे नुकसान झाले. रात्री ११ ते २ वाजेपर्यंत सारखे वादळ आणि पाऊस सुरू होता. बेलोरा, पांढुर्णा, मांजरजवळा, रोहडा, कुंभारी, आमटी, मोप, शिवणी, होरकड या गावात मोठे नुकसान झाले आहे.