सहा तास रांगेत, तरीही पैसा नाही
By Admin | Updated: November 16, 2016 00:24 IST2016-11-16T00:24:44+5:302016-11-16T00:24:44+5:30
पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आल्यानंतर पैसे काढण्यासाठी बँकांसह एटीएममध्ये प्रचंड रांगा लागल्या आहेत.

सहा तास रांगेत, तरीही पैसा नाही
लिंक फेल : अनेक एटीएमसमोर पहाटेपासूनच ग्राहकांच्या रांगा
यवतमाळ : पाचशे आणि हजाराच्या नोटांवर बंदी आल्यानंतर पैसे काढण्यासाठी बँकांसह एटीएममध्ये प्रचंड रांगा लागल्या आहेत. अनेक एटीएममध्ये पैशाचा खडखडाट असला तरी नागरिक मात्र रांगेत कायम आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ग्राहक तब्बल सहा तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हातानेच परतले. यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. त्यातूनच पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडण्यापर्यंत नागरिकांचा संताप अनावर झाला.
लिंक फेल झाल्याने बँकेचे कामकाजही काही तास प्रभावित झाले. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकांच्या २५७ शाखेतून दररोज कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. डिपॉझीट करण्यासोबत विड्रॉल करणे आणि नोटांचा बदल करणे यासाठी दिवसभर रांगा कायम असतात. गत पाच दिवसातील ही उलाढाल ४५० कोटींच्या घरात आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील एटीएमपुढे सर्वाधिक गर्दी होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएमवर सर्वाधिक गर्दी होती. सकाळी ११ वाजतापासून ही रांग होती. मात्र सहा तास प्रतीक्षा केल्यानंतरही नागरिकांना पैसे मिळाले नाही. दिवसभर रांगेत उभे राहूनही रिकाम्या हातानेच परत जावे लागले. अशीच स्थिती बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आंध्रा बँक आणि इतर ठिकाणी दिसून येत होती. यामुळे ग्राहक संतप्त झाले होते. (शहर वार्ताहर)
पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमवर तोडफोड झाल्यानंतर पोलीस संरक्षणाची मागणी झाली. प्रत्यक्षात घटनेपूर्वीच पोलीस संरक्षणाची मागणी बँक व्यवस्थापनाने करायची होती. जिल्ह्यात सुरक्षा मागणाऱ्या व्यवस्थापनाला पोलीस संरक्षण दिले जाणार आहे.
- प्रशांत देशपांडे, अग्रणी बँक व्यवस्थापक, यवतमाळ