उमरखेड शहराच्या बायपासचा प्रश्न अडगळीत

By Admin | Updated: June 12, 2016 02:14 IST2016-06-12T02:14:09+5:302016-06-12T02:14:09+5:30

शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य महामार्गामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून,

The question of bypass of Umarkhed city is inconsequential | उमरखेड शहराच्या बायपासचा प्रश्न अडगळीत

उमरखेड शहराच्या बायपासचा प्रश्न अडगळीत

वाहतूक शहरातून : नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्ग शहरातून जात असल्याने अपघाताची भीती
उमरखेड : शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य महामार्गामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अहोरात्र धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघाताची भीती कायम असते. ही वाहतूक वळविण्यासाठी बायपासची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून असून, आंदोलन करूनही बायपास मात्र झाला नाही. जणू बायपासचा प्रश्न अडगळीत पडल्याचे दिसते.
उमरखेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. याठिकाणी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कार्याल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी कायम असते. त्यातच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ते अरुंद झाले आहे. त्यावरून वाटचाल करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. यासोबतच शहरातून नागपूर-बोरी-तुळजापूर राज्यमार्ग जातो. यावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. अवजड वाहने आणि मोठाले ट्रेलर शहरातूनच धावतात.
मोठा ट्रेलर शहरातून जात असताना मोठा अडथळा निर्माण होतो. तासंतास वाहतूक खोळंबलेली असते. या वाहतुकीमुळे अपघाताची भीती असते. शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळात वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. बसस्थानाकसमोरील आणि ढाणकी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
यावर पर्याय म्हणून शहरातून जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविणे आवश्यक आहे. त्यासाठी काही वर्षापूर्वी बायपासचा मुद्दा पुढे आला. यासाठी विविध संघटना व पक्षांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. परंतु अद्यापही बायपास निर्माण झाला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालताना दिसतात. या प्रकरणी आता नागरिकच रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The question of bypass of Umarkhed city is inconsequential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.