पुसदचे मार्केट यार्ड दरिद्री
By Admin | Updated: June 5, 2016 02:11 IST2016-06-05T02:11:12+5:302016-06-05T02:11:12+5:30
येथील बाजार समिती मार्केट यार्ड वर्षानुवर्षे दरिद्रीच राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षितता यासारख्या मूलभूत सुविधा येथे नाहीत.

पुसदचे मार्केट यार्ड दरिद्री
शेतकऱ्यांना सुविधा नाही : पदाधिकारी प्रतिष्ठा जपण्यात मश्गुल
पुसद : येथील बाजार समिती मार्केट यार्ड वर्षानुवर्षे दरिद्रीच राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षितता यासारख्या मूलभूत सुविधा येथे नाहीत. बाजार समितीचे पदाधिकारी पदासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असतात. मात्र मार्केट यार्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.
एमआयडीसी परिसरातील नव्या मार्केट यार्डमध्ये तालुक्यातील शेती माल आणला जातो. त्याचे सौदे मोठ्या प्रमाणात होत असतात. पण या मार्केट यार्ड परिसरामध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. पिण्याचे थंड पाणी, शेतकरी भवन, चहापाण्यासाठी कॅन्टीन अशा कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. तालुक्यातून प्रतिहंगाम सोयाबीन, भुईमुगाची आवकही चांगल्या प्रकारची असते. परिसरातील शेतकऱ्यांचा येणारा माल व यापासून मिळणारे उत्पन्नही मोठे आहे. तरी येथील समस्या वाढतच आहेत. पुसदचे मार्केट यार्ड दिवसेंदिवस दरिद्री होत चालले आहे. प्रशासनाने व नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठेबरोबरच मार्केट यार्डाचीदेखील प्रतिष्ठा सुधारणे गरजेचे आहे. सदर प्रतिनिधीने मार्केट यार्डचा फेरफटका मारला असता २ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेंग पाण्यामुळे भिजली. बाजार समितीचे सभापती किंवा सचिवसुद्धा फिरकले नाही.
वाशिम, मानोरा येथील मार्केटमध्ये रात्री १२ वाजतापर्यंत काटे चालतात. पुसदमध्ये सायंकाळी ७ वाजता काटे बंद आणि ६ वाजताच्या नंतर सर्व गाड्या येणे बंद होते. कास्तकारांसाठी व्यवस्थित हॉटेलसुद्धा नाही. पाच कि़मी. पायी जालन जेवण करावे लागते. सचिव व पदाधिकारी याची दखल घेत नाही, असे मरसूळ येथील शेतकरी काशिराम जाधव यांनी सांगितले. वाशिम, मानोरा व अनसिंग यार्डमध्ये जाग्यावर काटे होतात. कास्तकारांना सर्व व्यवस्थित सवलती देतात. पुसद शिवारातील ८० टक्के माल बाहेर जातो, केवळ २० टक्के माल येतो, असे मुंगशी येथील मधुकर चव्हाण, सुभाष चव्हाण, कार्ला येथील शामराव राठोड यांनी सांगितले.
पुसदपेक्षा लहान असलेल्या मनोरा येथील मार्केट यार्डमध्ये अद्ययावत शेतकरी भवन, सीसीटीव्ही कॅमेरे, थंड पेयजलाची व्यवस्था या उपर मालाचा काटा झाल्याबरोबर ताबडतोब पैसे दिल्या जाते. तर पुसदमध्ये अडत्यांना व्यापारी व्यवस्थित पैसे देत नाही, असे बांशी येथील गजानन मारकड व वसंता मारकड, बोरगडीचे पांडुरंग साखरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)