पुसदची जीवनदायी पूस प्रदूषणाच्या विळख्यात

By Admin | Updated: April 24, 2015 01:19 IST2015-04-24T01:19:41+5:302015-04-24T01:19:41+5:30

कधीकाळी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहणारी, उन्हाने चमचम चमकणारे पाणी आणि त्यातून पाहता क्षणीच प्रसन्न करणारी पूस नदी आता ...

Pusad's Life-Friendly Pollution | पुसदची जीवनदायी पूस प्रदूषणाच्या विळख्यात

पुसदची जीवनदायी पूस प्रदूषणाच्या विळख्यात

पुसद : कधीकाळी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहणारी, उन्हाने चमचम चमकणारे पाणी आणि त्यातून पाहता क्षणीच प्रसन्न करणारी पूस नदी आता प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. अरुंद झालेले नदीपात्र, ठिकठिणी साचलेले डबके आणि शहरातील गटाराचे पाणी यामुळे जीवनदायी पूस नदीचे वैभव हरविले आहे.
पूस नदी ही गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते. या नदीसह तालुक्यात लहान नद्या आणि नाले आहेत. पूस नदी ही दक्षिण वाहिनी आहे. मुबलक पाणी आणि नदी काठची जमीन सुपीक करणारी ही जीवनदायीनी नदी गेल्या काही वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे. या नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र नदीच्या पात्रात होणाऱ्या प्रदूषणाकडे कोणाचेही लक्ष नाही.
शहराच्या सीमेवरून एकेकाळी खळखळून वाहणारी पूस नदी म्हणजे नगरवासियांची तृष्णा भागवणारी जीवनदायीनी. शहराचे सौंदर्य फुलविणारी ही पूस नदी आज केवळ नावालाच उरली आहे. या निसर्गनिर्मित देणगीची मानवी यंत्रनेने काळजी न घेतल्यामुळे नैसर्गिक संपत्तीची ही देणगी काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे.
नदी पात्राच्या हाकेच्या अंतरावर मानवी वस्ती असून, या वस्त्यांच्या विस्तारही काढलेला आहे. या वस्त्यांमधील नागरिकांना नेहमी दुर्गंधीयुक्त वातावरण व सरपटणाऱ्या जिवांना सामोरे जावे लागते. अशा समस्या येथे असून मानवी दोषांमुळे या नदीपात्राची वाट लागत आहे. बदलती परिस्थिती व मानवी चुकांमुळे नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. प्रवाहाला खिळ बसून बाधा निर्माण झाली आहे. रेती व माती उपशामुळे नदीपात्रात छोटे-मोठे खड्डे पडले आहेत.
वाळू व जलजीव नामशेष झाले आहेत. नदीचे पात्र कमी-कमी होत चालल्याने नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नदीपात्रात शहरातील संबंध वापराचे घाण सांडपाणी नालीव्दारे सोडले जात आहे. शहरातील घाण, केरकचरा, शौचालयातील घाण, मृत
जनावरे या नदीपात्रात टाकली जातात.
ट्रॅक्टर ट्रॉलीव्दारे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे खोलगट पात्राचे सपाटीकरण झाले आहे. या पात्रात बेशरमाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पूस नदीची ही दुरावस्था पाहून सहजपणे शब्द पडता पूस नदीला गतवैभव मिळेल का, यासाठी भगिरथाची भूमिका प्रशासकीय स्तरावर कोण वठविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pusad's Life-Friendly Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.