पुसदकरांना आता मुबलक पाणी
By Admin | Updated: August 7, 2015 02:24 IST2015-08-07T02:24:44+5:302015-08-07T02:24:44+5:30
नगरपरिषदेने १३ व्या वित्त आयोगाच्या दोन कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानातून २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम केले...

पुसदकरांना आता मुबलक पाणी
पाणीपुरवठा सभापती : नगर परिषदेने बांधला नवीन जलकुंभ
पुसद : नगरपरिषदेने १३ व्या वित्त आयोगाच्या दोन कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानातून २० लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम केले असून सदर जलकुंभ आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या जलकुंभातून पुसदकरांना मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले.
पुसद शहरात पूर्वी दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा होत होता. मात्र जुन्या टाकीचा ढाचा नादुरुस्त झाल्याने नगरपरिषदेने एकाच टाकीवरून पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी लागली. तसेच पाणीपुरवठा कमी आणि अनियमितही होत होता. त्यामुळे नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी पुढे आली. आमदार मनोहरराव नाईक मंत्री असताना नवीन जलकुंभाच्या उभारणीसाठी १३ व्या वित्त आयोगातून अडीच कोटी अनुदान मंजूर झाले होते. या निधीतून एका वर्षात नवीन जलकुंभाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आता सर्व परिसरातील पाईप लाईन जोडणीचे काम सुरू आहे. हेही काम पूर्णत्वास येणार असून पुसदकरांना मुबलक पाणी देण्याचा मानस असल्याचे सभापती दुधे यांनी सांगितले.
जुनी टाकी पाडून त्या ठिकाणी तिसरी नवीन पाणी टाकी बांधण्यात येणार आहे. तिसऱ्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना दिवसातून दोनवेळा पाणीपुरवठा नियमितपणे केला जाणार आहे. यासाठी ग्राहकांनी नगरपरिषदेला सहकार्य करणे अपेक्षित आहे.
नियमित नळबिलाचा भरणा करण्याची आवश्यकता आहे. पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात ३२ टक्के जलसाठा असून भविष्यात समाधानकारक पाऊस झाल्यास धरणाची पातळी वाढेल आणि पुसदकरांना मुबलक पाणी मिळेल, असेही दुधे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)