पुसदला कोरोनाने निवृत्त बँक अधिकाऱ्यांसह दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:41+5:30
कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटका आला होता. त्याला उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुसदला कोरोनाने निवृत्त बँक अधिकाऱ्यांसह दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा आणखी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर पुसद येथील दोघांचा उपचारादरम्यान वर्धा व यवतमाळ येथे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने १८ जणांचा बळी घेतला. तर कोरोना रुग्णांची एकंदर संख्या ५१७ झाली असून सध्या १४४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे.
कोरोना संसर्गाचा धोका आता सर्वत्र वाढला आहे. पुसद शहरातील मोतीनगर परिसरातील ७० वर्षीय वृद्धावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुसद शहरातील पार्वतीनगर भागातील ७० वर्षीय इसमाला पॅरिलिसीसचा झटका आला होता. त्याला उपचारासाठी वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्धेतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी पुसद शहरातील गढी वार्डात असलेल्या एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला.
शुक्रवारी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १४ जणांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील डोर्लीपुरा (पाटीपुरा) येथील एक पुरुष, भोसा येथील सरस्वती ले-आऊट येथील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन महिला, पुसद शहरातील गायमुखनगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील संभाजीनगर येथील दोन महिला, पुसद शहरातील खाटीकवार्ड येथील दोन पुरुष, उमरखेड शहरातील वार्ड क्र.१ मधील पुरुष, उमरखेड येथील अन्य एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील गांधीनगर येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील एक महिला आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३५७ रुग्ण बरे झाले. सद्यस्थितीत १३२ जण भरती आहेत. शुक्रवारी ५८ नमुने तपासणीस पाठविले गेले. आतापर्यंत ८६२४ पैकी ८५२० नमुन्यांचे अहवाल प्राप्त आहे. आणखी १०४ अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ८००३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले.
आणखी २१ जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतानाच २१ जणांनी कोरोनावर यशस्वी मातही केली आहे. आयसोलेशन वार्डात उपचारानंतर बरे झालेल्या या २१ जणांना शुक्रवारी सुटी देण्यात आली. तूर्त १४४ रुग्णांवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
बनावट ई-पास, दोघांना लोहारा चौकात अटक
अमरावतीवरून येणाºया एमएच-२९-बीसी-४५७९ क्रमांकाच्या वाहनाची गुरुवारी रात्री लोहारा चौकात तपासणी केली असता त्याची ई-पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून एजाज खान युसुफ खॉ पठाण रा. वाघाडी भोयर, निदान प्रदीपराव लोखंडे रा. गुलमोहर अर्पाटमेंट आर्णी रोड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. त्यांचे वाहनही जप्त करण्यात आले.