पुसद शहर रस्ता रुंदीकरणात प्रचंड दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:13 IST2017-09-01T22:11:59+5:302017-09-01T22:13:12+5:30
शहरातील वाशिम मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

पुसद शहर रस्ता रुंदीकरणात प्रचंड दिरंगाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरातील वाशिम मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्ता रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेल्या बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सण-उत्सवाच्या काळात शहरात मोठी गर्दी होत असून हा अडथळा दूर करावा, अन्यथा होणाºया परिणामाला जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र पुसद वाहतूक शाखेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुसद शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते विश्रामगृह या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामात प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून रस्त्यावर बांधकाम साहित्य पडले आहे. मोठ्ठाल्या डब्बरचे ढिग रस्त्याच्या कडेला आहे. तसेच वीज खांबही वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. पुसद शहर संवेदनशील असून आगामी काळात गणेश विसर्जन, बकरी ईद, नवरात्र उत्सव येत आहे. परंतु कंत्राटदाराच्या दिरंगाईने विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर रस्त्यावर असलेल्या अडथळ्यांमुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गणेश विसर्जनापूर्वी या रस्त्यावरील अडथळे दूर करावे. एखादा अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे पत्र बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. सदर पत्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी दिले आहे. आता बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.