पुसद तालुक्यामध्ये एका डॉक्टरसह सहा जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:16+5:30
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३७ क्षेत्र सील केले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील क्षेत्रांचा समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय वारंवार हात स्वच्छ धुवावे, सामाजिक अंतर राखावे आदी सूचना दिल्या जात आहे. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नाही.

पुसद तालुक्यामध्ये एका डॉक्टरसह सहा जणांना कोरोनाची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यात शनिवारी एका डॉक्टरसह सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२९ वर तर एकूण बाधितांची संख्या ५२८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. शनिवारी तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील एका डॉक्टरसह दोन व हिवळणी (पा) येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी उशिरा रात्री शहरातील हनुमान वॉर्डातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५२८ वर पोहोचला आहे.
तालुक्यात सुरुवातीपासून आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र आतापर्यंत तब्बल १७ जणांचे कोरोनाने बळी गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३७ क्षेत्र सील केले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील क्षेत्रांचा समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय वारंवार हात स्वच्छ धुवावे, सामाजिक अंतर राखावे आदी सूचना दिल्या जात आहे. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नाही.
दुकाने व रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत आहे. यातून शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सवनाची बाजारपेठ चार दिवस बंद
महागाव तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तालुक्यातील सवना येथे ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागरिकांनी गाव स्वयंस्फूर्तीने चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महागाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे. सवना गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्यातील पिंपळगाव येथील सूतगिरणीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. परिणामी तेथील कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.