पुसद तालुक्यात ३०४ मिमी पाऊस
By Admin | Updated: June 19, 2017 00:50 IST2017-06-19T00:50:20+5:302017-06-19T00:50:20+5:30
तालुक्यात यंदा मृगनक्षत्राला प्रारंभ झाला तेव्हापासून पावसाने दमदार हजेरी लावली. आतापर्यंत तालुक्यात

पुसद तालुक्यात ३०४ मिमी पाऊस
१८ गावांना फटका : एकाच दिवशी झालेल्या ९६ मिमी पावसाने ५० हेक्टर शेती खरडली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यात यंदा मृगनक्षत्राला प्रारंभ झाला तेव्हापासून पावसाने दमदार हजेरी लावली. आतापर्यंत तालुक्यात ३०४ मिमी पावसाची नोंद झाली असून १४ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीचा तालुक्यातील १८ गावांना फटका बसला. तब्बल ५० हेक्टरवरील शेती खरडून गेली.
पुसद तालुक्यात ७ जूनपासून दररोज पाऊस कोसळत आहे. मृगनक्षत्राच्या पहिल्या दिवशी सहा मिमी, ८ जूनला तीन मिमी, ९ जूनला ५५ मिमी, १० जून रोजी १६ मिमी, १२ जून रोजी ३१ मिमी, १३ जून रोजी ६२ मिमी, १४ जून रोजी ९६ मिमी तर १५ जून रोजी ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गत तीन दिवसांपासून पावसाने उघाड दिली असून शेतात पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
पुसद तालुक्यात १४ जून रोजी अवघ्या दीड तासात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदी काठावरील गावांना व शेतींना याचा मोठा फटका बसला. तालुक्यातील १८ गावामधील शेतजमीन खरडून गेल्या. नदी काठच्या जमिनीचा खडक उघडा पडला. त्यामुळे आता जमिनीत पीक कसे घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अतिवृष्टीने खरडलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे. सदरचे सर्वेक्षण तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदींची चमू करणार आहे. त्यानुसार बाधित जमिनीसाठी हेक्टरी १२ हजार २०० रुपये शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पुसद तालुक्यातील शेलू, सांडवा, मांडवा, कारलादेव, बोरगडी, बोरी, उपवनवाडी, खडकदरी, कोपरा, आरेगाव, वडसद, मनसळ, कृष्णनगर आदी १८ गावांना मोठा फटका बसला. तहसीलदार डॉ. संजय गरकल, गटविकास अधिकारी समाधान वाघ, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड, कापूस पणन महासंघाचे संचालक ययाती नाईक, भिक्कन राठोड आदींनी अतिवृष्टी बाधित गावांना भेटी दिल्या.
तालुक्यात दमदार पावसाने ६० टक्के पेरणी आटोपली असून अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.