साथीच्या आजाराने पुसद तालुका बेजार
By Admin | Updated: August 10, 2014 23:14 IST2014-08-10T23:14:03+5:302014-08-10T23:14:03+5:30
कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक ऊन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

साथीच्या आजाराने पुसद तालुका बेजार
पुसद : कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक ऊन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत अतिसार, हगवण, मलेरिया, थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजाराने आबाल-वृद्ध त्रस्त झाले आहेत. पावसाचे अपेक्षित प्रमाण नसल्याने वातावरणात दमट हवामान निर्माण होऊन आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल्ल दिसत आहे.
पुसद शहरातील उपजिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करून घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अनेक गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण झाली आहे. एकंदरित तालुक्यात साथरोगाने थैमान घातले असताना प्रशासन मात्र सुस्तावले आहे. प्रशासकीय स्तरावर कोणतीही बैठक घेण्यात आली नाही, आरोग्य विभागाची यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. आजवर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. आम्हाला प्रशासकीय आदेश नसल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे म्हणत आरोग्य अधिकारी आपली जबाबदारी टाळत आहे.
सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या पुसद शहरात अनेक रुग्णालय असतानाही उपजिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिक मोठ्या संख्येने उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत. सध्या चांगला पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यातील दोष यामुळे शहरासह तालुक्यात अनेकांना आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. शहरात साथीच्या आजारात मोडल्या जाणाऱ्या ताप, सर्दी आदी आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शहरासह तालुकाभर अधून-मधून रिमझिम पाऊस त्यात सतत पावसाचे होणारे वातावरण आणि अचानक पडणारे ऊन यामुळे पाच ते सहा दिवसापासून वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असली तरी आरोग्य विभाग मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)