पुसद पोलीस ‘शाहरूख’च्या शोधात
By Admin | Updated: November 1, 2015 02:49 IST2015-11-01T02:49:26+5:302015-11-01T02:49:26+5:30
बांगलादेशींना पुसदमधून बनावट रहिवासी दाखले मिळवून देण्यासाठी शाहरूख नामक व्यक्तीने दोन तोतयांना सेतू केंद्रात उभे केले होते, ..

पुसद पोलीस ‘शाहरूख’च्या शोधात
बांगलादेशींचे प्रकरण : दोन तोतयांचा सहभागही झाला उघड
पुसद : बांगलादेशींना पुसदमधून बनावट रहिवासी दाखले मिळवून देण्यासाठी शाहरूख नामक व्यक्तीने दोन तोतयांना सेतू केंद्रात उभे केले होते, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी तो शाहरूख कोण, याचा शोध चालविला आहे.
दोन बांगलादेशींचे भारतियत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुसद तालुक्यातील वेणी(खुर्द)च्या महाई-सेवा केंद्रातून कागदपत्रे उपलब्ध करून दिली गेली. पोलीस तपासात पुसदच्या वसंतनगर परिसरातील शाहरूख नामक व्यक्तीने अज्ञात दोघांना सेतू केंद्रात उभे केले होते. त्यांची ओळख मो. आजीम व हबीब शेख अशी सांगण्यात आली. त्यावरून त्यांना सेतू केंद्रातून कागदपत्रे दिली गेली. पोलिसांनी हा शाहरूख नेमका कोण, आणि त्यांनी उभे केलेले ते तोतये दोन जण कोण, याचा शोध चालविला आहे. दरम्यान, ई-सेवा केंद्राच्या संचालकासह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान शाहरूखचे नाव पुढे आले. आता शाहरूखच्या अटकेनंतर त्याने उभे केलेल्या दोन तोतयांची नावे उघड होतील. शिवाय बांगलादेशींना पुसदमधून बनावट प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी शाहरूखवर नेमकी कुणी सोपविली, ही बाब या प्रकरणात सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. त्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यासाठी पुसद ग्रामीणचे ठाणेदार अनिल कुरळकर व पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)