लोकसहभागातून पूस नदी स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:27 IST2018-04-24T22:27:18+5:302018-04-24T22:27:18+5:30
शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे.

लोकसहभागातून पूस नदी स्वच्छता मोहीम
अखिलेश अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे. शहरासाठी महत्त्वाची असणाऱ्या या नदीचे पुरुज्जीवन करण्यासाठी पुसदकरांनी पुढाकार घेतला असून पावसाळ्यापूर्वी ही नदी लोकसहभागातून स्वच्छ केली जाणार आहे.
पूस नदीच्या स्वच्छतेसंदर्भात नुकतीच विश्रामगृहावर नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत पूस नदीच्या स्वच्छतेची भूमिका मांडण्यात आली. पूस नदीची लांबी वालतूर रेल्वेपासून ते दत्त खांडीपर्यंत चार किलोमीटर आहे. या भागातील स्वच्छता तसेच काही प्रमाणात खोलीकरण केल्यास नदी वाहती होईल. शिवाय परिसरातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढू शकतो. हा प्रकल्प मोठा असून लोकसहभागातून नदीला पुरुज्जीवित करण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
या कार्यास शहरातील सामाजिक संघटनांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक व श्रमदान करण्याचा पुढाकार व्यक्त केला. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या अभियानाला सहकार्य मिळत आहे. असे असले तरी शहरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, अधिकारी यांच्या सहकार्याची गरज आहे.
पूस नदीची साफसफाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहकार्य केले तर शहराची जीवनदायी पूस स्वच्छ आणि निर्मळ होणार यात शंका नाही.
सांडपाण्यामुळे दुरावस्था
पूस नदीपात्रात शहरातील सांडपाणी येते. त्यामुळे नदीपात्राला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच जलपर्णीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदी तीरावरच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता स्वच्छता मोहीम हाती घेतली असून यात सर्वांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.